नापाक ड्रोन बीएसएफ जवानांनी पाडले; ६ किलो नार्कोटिक्सचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 08:38 AM2023-02-05T08:38:57+5:302023-02-05T08:40:14+5:30
ड्रोनने नार्कोटिक्सच्या दोन बॅगा वाहून आणल्या होत्या. अमली पदार्थांची तस्करी करण्याकरिता पाकिस्तानी ड्रोननी पंजाबमध्ये घुसखोरी करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे.
जयपूर : राजस्थानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर अमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) गोळीबार करून पाडले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. ड्रोनने वाहून आणलेला ६ किलो नार्कोटिक्सचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ड्रोनने नार्कोटिक्सच्या दोन बॅगा वाहून आणल्या होत्या. अमली पदार्थांची तस्करी करण्याकरिता पाकिस्तानी ड्रोननी पंजाबमध्ये घुसखोरी करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. त्यातील काही ड्रोन विमाने बीएसएफने गोळीबार करून पाडली होती. आता राजस्थानच्या सीमेवरदेखील पाकिस्तानी ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अमली पदार्थांसाेबत स्फाेटकेही पाठविण्यात येतात. राजस्थान, गुजरात, पंजाब, काश्मीर येथून सीमा ओलांडून अमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा झालेले प्रयत्न लष्कराने हाणून पाडले.
पंजाबमध्ये शुक्रवारी ५ किलो अमली पदार्थ घेऊन आलेले पाकिस्तानी ड्रोन बीएसएफ जवानांनी गोळीबार करून पाडले होते. त्यानंतर आता राजस्थानातही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तैनात असलेले भारतीय लष्कराचे जवान अधिक सतर्क झाले आहेत.