पाकचे नापाक इरादे उद्ध्वस्त; मॅग्नेटिक बॉम्ब अन् ग्रेनेड घेऊन येणारे ड्रोन लष्कराने काश्मिरात पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:53 AM2022-05-30T06:53:37+5:302022-05-30T06:55:36+5:30
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दक्षिण काश्मिरात अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी झाली आहे.
जम्मू : जम्मू - काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रविवारी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारतीय सीमेत प्रवेश केल्यानंतर काही वेळातच एक पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. त्यावर सात मॅग्नेटिक बॉम्ब आणि सात यूबीजीएल ग्रेनेड होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दक्षिण काश्मिरात अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी झाली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, पोलिसांना राजबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तल्ली हरिया चक्क गावात सीमेवर एक ड्रोन दिसले. त्यानंतर जवानांनी गोळीबार करून ते पाडले. या ड्रोनवर सात मॅग्नेटिक बॉम्ब आणि सात अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर (यूबीजीएल) मिळाले. दहशतवाद्यांनी माेठा कट रचल्याचा पाेलिसांना दाट संशय आहे. ड्राेनला चीनी बॅटरी लावण्यात आलेली आहे.
लक्ष्य अमरनाथ यात्रा
या भागात ३० जूनपासून ४३ दिवस अमरनाथ यात्रा दोन मार्गांनी सुरू होणार आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानकडून अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.