पाकिस्तानला सतावतेय सर्जिकल स्ट्राइकची भीती? LoC जवळचे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड केले खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 11:07 AM2019-02-17T11:07:00+5:302019-02-17T11:08:00+5:30
पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराकडून कठोर कारवाईचे संकेत मिळत असून, सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच यावेळीही कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे.
श्रीनगर - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराकडून कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. उरी येथील हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच यावेळीही कारवाई होण्याची शक्यता पाहून पाकिस्तानचा भीतीने थरकाप उडाला असून, पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ असलेले दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड रिकामे करून दहशतवाद्यांना सैनिक तळांमध्ये नेल्याचे वृत्त आहे.
पुलवामा येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैश ए मोहम्मद विरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आल्याची घोषणा केली होती. तसेच लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भारताकडून कारवाईसाठी सुरू असलेल्या मोर्चेबांधणीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळच्या आपल्या विंटर पोस्ट खाली केलेल्या नाहीत. काश्मीरमधील बोचऱ्या हिवाळ्यामुळे या काळात विंटर पोस्ट खाली केल्या जातात. मात्र सध्या तेथे पाकिस्तानी सैनिक तैनात आहेत.
सीमारेषेच्या दोन्ही बाजूला तणावाचे वातावरण आहे. मात्र अद्याप लष्कराची तैनाती झालेली नाही, अशी माहिती काश्मीरमधील गुप्तचर खात्यामधील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेपलिकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर कारवाई करण्याचा भारताची इरादा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पर्यायच भारतीय लष्कराकडे उरतो. मात्र अशा कारवाईमुळे तणाव अधिकच वाढू शकतो.