पाकिस्तान पडले तोंडघशी!
By admin | Published: October 6, 2016 05:57 AM2016-10-06T05:57:17+5:302016-10-06T05:57:17+5:30
नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर गेल्या आठवड्यात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत भारतात शंका व्यक्त होत असली
नवी दिल्ली : नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर गेल्या आठवड्यात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत भारतात शंका व्यक्त होत असली, तरी असे स्ट्राइक्स झाले होते, असे पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेनेच नव्हे, तर तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही मान्य केले आहे. किंबहुना, स्ट्राइक्सच्या वृत्ताला त्यांनीच दुजोरा दिला आहे. भारतीय लष्करानेही स्ट्राइक्सचे व्हिडीओ फुटेज केंद्राकडे सादर केले असून, ते जारी करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने स्ट्राइक्स केले नाहीत, असा दावा करीत असतानाच, लिपी, भिंबेर भागातील पोलीस अधीक्षकांनी आपल्या भागात दहशतवादी तळांवर हल्ले झाले आणि त्यात किमान १२ दहशतवादी ठार झाले, असे स्पष्ट केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अन्यत्र झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या सहा दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमध्ये घालून दुसरीकडे नेण्यात आले आणि अज्ञात ठिकाणी पुरले, असे तेथील रहिवाशांनी सांगितले आहे.
२९ सप्टेंबर उजाडायच्या आधी झालेल्या या हल्ल्यानंतर उडालेल्या चकमकीत ठार झालेल्यांचे मृतदेह अज्ञात ठिकाणी पुरण्यासाठी ट्रक्समध्ये कसे भरून नेण्यात आले, याचे वर्णन रहिवाशांनी केले. हल्ल्यामुळे थोडा वेळच, पण जोरदार गोळीबार झाल्याचे व त्यात जिहादींना राहण्यासाठी बनविलेल्या तात्पुरत्या इमारतीं कशा नाहीशा झाल्या, याचे वर्णन या साक्षीदारांनी केले. एका इंग्रजी दैनिकाने त्या रहिवाशांशी बोलून हे वृत्त दिले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने लिपी, भिंबेर भाग जिथे आहे, त्या मिरपूरचे पोलीस अधीक्षक गुलाम अकबर यांचे स्टिंग आॅपरेशन केले.
इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने आपण पोलीस महानिरीक्षक मुश्ताक बोलतोय, असे सांगून, अधीक्षक गुलाम अकबर यांच्याकडून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ची सविस्तर माहिती घेतली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी भारतीय लष्करातर्फे सर्जिकल स्ट्राइक्सचा व्हिडीओ केंद्राला सादर करण्यात आला.
तो संपादित स्वरूपात सर्वांसाठी खुला करावा, त्यामुळे शंका उपस्थित करणाऱ्यांचे, तसेच पाकिस्तानचे तोंड बंद होईल, असे भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
मात्र, भाजपा नेत्यांनी आपले तोंड बंद ठेवावे, अशा
सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.
या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते, याचा तपशीलही त्यांनी दिला. भारत आणि पाकिस्तानने मात्र, या ठिकाणांची माहिती जाहीर केलेली नाही. प्रत्यक्ष साक्षीदार आणि गुप्तचर खात्याकडील माहितीच्या आधारे या कारवाईत किमान ३८ व कमाल ५० जण ठार झाले आहेत. याशिवाय पाकचे पाच सैनिक ठार व ९ जखमी झाल्याचे पोलीस अधीक्षकांनी मान्य केले.
आम्हाला शांतता हवी : पाकिस्तानला युद्ध नव्हे, तर शांतता हवी आहे. भारताशी चर्चा करून काश्मीरसह सर्व प्रश्न सोडविण्यास आमची तयारी आहे. मात्र, पाकिस्तान धमक्यांना जुमानणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्यास, तुल्यबळ प्रत्युत्तर देऊन देशाचे रक्षण करण्यास पाकिस्तानची सैन्यदले व जनता तत्पर आहे. - नवाज शरीफ, पंतप्रधान, पाकिस्तान
आपल्या भागांत १२ दहशतवाद्यांना भारतीय कमांडोजनी ठार मारल्याचे सांगितले. त्या दहशतवाद्यांचे मृतदेह नंतर अन्यत्र नेण्यात आले. ते कुठे नेले, हे आपणास माहीत नाही. बहुधा त्यांच्या गावाला पाठवण्यात आले असावेत, असेही पोलीस अधीक्षकाने सांगितले.