काश्मिरात फडकविले पाकिस्तानचे झेंडे
By Admin | Published: September 25, 2015 11:46 PM2015-09-25T23:46:37+5:302015-09-25T23:46:37+5:30
काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी ईदनिमित्त नमाज पठणानंतर तरुणांचे गट आणि सुरक्षा दलात संघर्ष झाला.
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी ईदनिमित्त नमाज पठणानंतर तरुणांचे गट आणि सुरक्षा दलात संघर्ष झाला. श्रीनगरच्या काही भागात निदर्शने करणाऱ्या युवकांनी पाकिस्तान आणि अल-जेहाद या दहशतवादी संघटनेचे झेंडेही फडकविले. दरम्यान, खबरदारी म्हणून सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नमाजानंतर तरुणांनी श्रीनगरच्या अनेक भागात पोलीस आणि निमलष्करी दलावर दगडफेक केली. इदगाह, राजौरी, कदल आणि अनंतनाग जिल्ह्यातही काही ठिकाणी संघर्ष झाला. आंदोलनकर्त्या युवकांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलाला अश्रुधूर सोडावा लागला. कायदा सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने सय्यद अली शाह गिलानी, मीरवाईज उमर फारुख, यासिन मलिक, शब्बीर शाह यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
राज्यातील इंटरनेट सेवा बंद
असामाजिक तत्त्वांद्वारे देशद्रोही कारवायांसाठी दुरुपयोग होऊ नये म्हणून राज्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. (वृत्तसंस्था)