"एस जयशंकर यांनी स्वतःच सांगितले की..."; भारतासोबतच्या संबंधावर पाकिस्ताने मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:10 PM2024-10-08T13:10:22+5:302024-10-08T13:21:48+5:30
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेसाठी पाकिस्तानात जाणार आहेत.
S Jaishankar Pakistan Visit: आगामी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतासोबत द्विपक्षीय चर्चेची शक्यता पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या परिषदेच्या भेटीदरम्यान भारतासोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे पाकिस्तानने मंगळवारी स्पष्ट केले. या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचे एक शिष्टमंडळ इस्लामाबादला जाणार आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार असल्याची गेल्या आठवड्यात घोषणा करण्यात आली. या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या पाकिस्तान भेटीसंदर्भात एक मोठे विधान केले आमचा आगामी पाकिस्तान दौरा द्विपक्षीय चर्चेसाठी नसून बहुपक्षीय कार्यक्रमासाठी असेल. यावेळी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या मुद्द्यावर बोलणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेसुद्धा याबाबत भाष्य करत अशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचे म्हटलं आहे.
एस जयशंकर यांच्या भेटीबद्दल विचारले असता, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी ५ ऑक्टोबर रोजी केलेले विधान तुम्ही लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे, ज्यात त्यांनी सांगितले की, त्यांचा आगामी इस्लामाबाद दौरा एका बहुपक्षीय कार्यक्रमासाठी आहे. पाकिस्तान-भारत संबंधांवर चर्चा करण्यासाठी नाही. त्यांचे हे विधान स्वतःच संकेत देत आहे," असे मुमताज झहरा बलोच म्हणाल्या.
दरम्यान, परराष्ट्र मंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात होती कारण नऊ वर्षांनी भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात जाणार होते. याआधी सुषमा स्वराज यांनी २०१५ मध्ये परराष्ट्र मंत्री असताना इस्लामाबादला भेट दिली होती. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेश कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट बैठकीसाठी ऑगस्टच्या सुरुवातीला भारताला पाकिस्तानकडून निमंत्रण मिळाले होते. यापूर्वी मे २०२३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात याच बैठकीसाठी भारत दौऱ्यावर आले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील सर्व पातळीवरील संबंध सर्वात खालच्या स्तरावर आहेत. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर इस्लामाबादने नवी दिल्लीशी राजनैतिक संबंध कमी केले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हल्ला केल्यानंतर संबंध आधीच ताणले गेले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते.