अभिनंदनला वीरचक्र पुरस्कार दिल्यानं पाकला झोंबली मिरची, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केला संताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:22 IST2021-11-23T16:21:51+5:302021-11-23T16:22:10+5:30
भारतीय हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यानंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबलेली दिसत आहे.

अभिनंदनला वीरचक्र पुरस्कार दिल्यानं पाकला झोंबली मिरची, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केला संताप!
भारतीय हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यानंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबलेली दिसत आहे. कारण यावरुन पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे. २०१९ साली झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं एफ-१६ फायटर जेट पाडलं होतं. यादरम्यान अभिनंदन वर्धमान यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कोसळलं होतं आणि अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं होतं. भारतानं केवळ आपल्या देशातील जनतेला खूश करण्यासाठी अभिनंदन वर्धमान यांना पुरस्कार दिला आहे. खरंतर त्यांनी पाकिस्तानचं कोणतंही विमान पाडलेलं नाही, असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे.
पाकिस्तानच्या हद्दीत पडण्याआधी भारतीय पायलट अभिनंद वर्धमान यांनी पाकचं एफ-१६ फायटर विमान पाडल्याचा दावा पाकिस्ताननं पूर्णपणे फेटाळून लावला आहे. अशी कोणतीही घटना घडली नव्हती आणि अशा पद्धतीनं न घडलेल्या घटेनेसाठी एका पायलटा पुरस्कार देऊन सन्मान करण्यामागचा भारताचा हेतू स्पष्ट दिसून येतो की त्यांना आपल्या देशातील जनतेला फक्त खूश करायचं आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतानं केलेले दावे कसे खोटे आहेत याचीच री ओढली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि अमेरिकेचे अधिकारी स्वत: येऊन पुष्टी करुन गेले आहेत. त्यांनी देखील कोणतंही पाकिस्तानी एफ-१६ विमान नष्ट झालेलं नसल्याचं जाहीर केलं आहे. भारतानं केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. जागतिक पातळीवर सत्य समोर आल्यानंतरही भारतानं न घडलेल्या घटनेसाठी आपल्या पायलटला पुरस्कार देणं ही खरंतर हास्यास्पद गोष्ट आहे, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. भारत सरकारकडून वीरतेसाठी दिला जाणारा पुरस्कार एका काल्पनिक घटनेसाठी दिला जातोय हे खरंतर पुरस्कारासाठीच्या मापदंडात बसत नाही. असं करुन भारतानं स्वत:चं हसं करुन घेतलं आहे, असंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.