'उरी' हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आधीच हलवले दहशतवाद्यांचे तळ
By admin | Published: October 1, 2016 12:00 PM2016-10-01T12:00:13+5:302016-10-01T13:18:39+5:30
'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ ते १७ तळ आधीच सुरक्षित स्थळी हलवले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - जम्मू-काश्मीरमधील 'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ते १७ तळ सुरक्षित स्थळी हलवले होते, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. ' भारताकडून जोरदार हल्ला होण्याची कुणकुण लागताच लष्कर व गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने 'लष्कर -ए-तोयबा', ' जैश -ए -मोहम्मद' आणि 'हिजबुल मुजाहिद्दीन'चे दहशतवादी सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. मनसेहरा व मुझफ्फराबाद येथून कार्यरत असलेले ४ दहशतवादी तळही हलवण्यात आल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले.
१८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर कारवाईच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक तळ रिकामे करत सुमारे ३०० दहशतवाद्यांनी पळ काढला. दहशतवाद्यांचे डझनभर तळ नौशेरा व झेलम या भागात तर काही तळ स्थानिक वस्तीत हलवण्यात आल्याचे समजते.
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.