पाकिस्तान आजही दहशतवाद्यांसाठी स्वर्गच- अमेरिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 11:19 AM2018-09-22T11:19:36+5:302018-09-22T11:21:48+5:30
दहशतवादी संघटनांवर कारवाई होत असल्यानं अमेरिकेनं व्यक्त केली नाराजी
नवी दिल्ली: पाकिस्तानदहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित देश असल्याचं अमेरिकन सरकारनं आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. अमेरिकेच्या सरकारनं 'कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम 2017' या नावानं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे दहशतवाद्यांना आसरा देणारा पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा जगसमोर आला आहे. पाकिस्तान सरकारकडून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांवर योग्य कारवाई केला जात नाही. त्यामुळेच या संघटना भारतात हल्ले करतात, अशा शब्दांमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणावर भाष्य केलं आहे.
लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदचा उल्लेख या अहवालात आहे. 'हाफिज सईदला जानेवारी 2017 मध्ये ताब्यात घेण्यात आलं. यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये त्याची सुटका झाली. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या संघटना अगदी उघडपणे लोकांकडून निधी गोळा करतात, तरुणांची भरती करतात, त्यांना दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देतात. मात्र पाकिस्तान सरकारनं याला कोणताही लगाम घातलेला नाही', असं अमेरिकेनं अहवालात म्हटलं आहे.
पाकिस्तान सरकार दहशतवादाला रोखण्यासाठी कठोर पावलं उचलताना दिसत नाही. त्यामुळेच दहशतवादी संघटनांकडून सर्रास हिंसक कारवाया केल्या जातात. या कारवायांचा फटका भारतासह पाकिस्तानलाही अनेकदा बसला आहे. आत्मघाती हल्ले, दिवसाढवळ्या केल्या जाणाऱ्या हत्या, शाळा, बाजार, सरकारी कार्यालयांवर होणारे ग्रेनेड हल्ले यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तान सरकारनं कठोर भूमिका न घेतल्यानं दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाल्याचं अमेरिकन सरकारच्या अहवालातून अधोरेखित झालं आहे.