काश्मीरवर बोलायचा पाकला अधिकारच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 04:57 AM2019-08-30T04:57:01+5:302019-08-30T04:57:18+5:30
राजनाथसिंह; भारतात घातपाती कारवाया करणे थांबवा
लेह : काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून, त्याविषयी बोलायचा पाकिस्तानला काडीचाही अधिकार नाही असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ठणकावले आहे. येथे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (डीआरडीओ) या संस्थेतर्फे गुरुवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
काश्मीर पाकिस्तानचे होते कधी की ते या प्रदेशाबद्दल इतके अश्रू ढाळत आहेत असाही सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर एक देश म्हणून त्याचा भारताने नेहमीच आदर केला आहे. पाकिस्तानशी आम्हाला उत्तम संबंध हवे आहेत. मात्र त्याआधी भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचे पाकिस्तानने थांबविले पाहिजे.
मोदी सरकारने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्या निर्णयानंतर राजनाथसिंह लेहमध्ये पहिल्यांदाच आले होते. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचे गेल्या काही दिवसांत अनेक प्रयत्न केले. पण त्याची इतर देशांनी गंभीर दखल घेतली नाही. लडाखमधील सुरक्षा व्यवस्थेचा राजनाथसिंह यांनी या दौऱ्यामध्ये आढावा घेतला. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी हक्कांची जी गळचेपी सुरू आहे, त्याबद्दल पाकिस्ताननेबोलले पाहिजे. काश्मीर प्रश्नाबाबत कोणताही देश पाकिस्तानसोबत नाही. ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे आपण अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क इस्पेर यांना दूरध्वनीवरील संभाषणात सांगितल्याचेही राजनाथसिंह
म्हणाले. (वृत्तसंस्था)
राजनाथसिंह लडाखमध्ये
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी लडाख येथील ‘किसान विज्ञान मेळ्या’ला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘डीआरडीओ’च्या फार्ममध्येही पाहणी केली.
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना
काश्मीरवर काहीही हक्क नसताना पाकिस्तान सध्या बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा रीतीने वागत आहे.
लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन तेथील स्थानिक नागरिकांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे.
३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीर, लडाखच्या विकासातील मोठा अडथळा दूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.