पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:48 AM2024-07-30T05:48:30+5:302024-07-30T05:50:12+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या (एसएसजी) ६००हून अधिक कमांडोंनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे, असा दावा जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक शेषपाल वैद यांनी केला आहे. या कमांडोंचे नेतृत्व पाक लष्कराचा जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) आदिल रहमानी करत आहे, तसेच आणखीही कमांडो सीमा ओलांडून येण्याच्या तयारीत असल्याचे वैद म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद म्हणाले की, पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये शिरले असून भारतीय लष्कराच्या १५व्या व १६व्या कोअरला कारवाईत गुंतवून ठेवायचे, असा कट त्यांनी आखला आहे. हा एक प्रकारचा गनिमी कावा असून, त्याचा भारताने कठोर मुकाबला केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
ही युद्धाची पूर्वतयारीच, तसेच उत्तर द्यावे लागेल
शेषपाल वैद यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराचा लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम याने जम्मू-काश्मीरमध्ये याआधीच घुसखोरी केली आहे. त्याने सर्व स्लीपर सेल सक्रिय केले आहेत. वैद यांनी दावा केला की, पाकिस्तानी लष्कराच्या आणखी दोन बटालियन जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. काश्मीरमध्ये ज्यापद्धतीने हल्ले करण्यात आले ती युद्धाची पूर्वतयारी आहे. त्यानुसारच भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. खोऱ्यात गेल्या काही महिन्यांत भारतीय लष्करी जवानांवर ज्या पद्धतीने हल्ले झाले त्यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात आहे, असा कयास भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
...मोठ्या युद्धाची तयारी
काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून ज्या कारवाया सुरू आहे, त्या अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची भारताने तयारी ठेवायला हवी. - शेषपाल वैद