पाकिस्तानातून आली फिटनेस चॅलेंजची लाट, क्रीडामंत्र्यांनी केली होती सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 06:18 PM2018-05-25T18:18:26+5:302018-05-25T18:18:26+5:30
दोन वर्षांपूर्वी क्रीडामंत्र्यांनी दिलं होतं फिटनेस चॅलेंज
नवी दिल्ली: क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी क्रीडा क्षेत्रातील अनेकांना दिलेल्या फिटनेस चॅलेंजची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. राठोड यांनी पुश अप्स मारतानाचा व्हिडीओ ट्विट करत विराट कोहली, सायना नेहवाल, ऋतिक रोशन यांना फिटनेस चॅलेंज दिलं. यानंतर अनेकांनी व्यायाम करतानाचे व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या फिटनेस चॅलेंजचं मूळ पाकिस्तानात आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील सिंध प्रांताचे क्रीडा मंत्री मोहम्मद बक्स महर यांनी फिटनेस चॅलेंज दिलं होतं. 2016 च्या सुरुवातीला महर क्रीडा मंत्री असताना त्यांनी बाकीच्या मंत्र्यांना हे चॅलेंज दिलं होतं. महर यांनी फिटनेस चॅलेंजच्या व्हिडीओमध्ये 40 सेकंदांमध्ये 50 पुशअप्स मारले होते. इतर मंत्र्यांनी हे चॅलेंज स्वीकारावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
तरुणांनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावं, फिटनेस चॅलेंजमधून त्यांनी प्रेरणा घ्यावी, असा महर यांचा प्रयत्न होता. तसं आवाहनही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं होतं. राठोड यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओतूनही हेच आवाहन केलं. मोहम्मद बक्स महर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांचे निकटवर्तीय मानले जातात.