पाकिस्तान नॅशनल डे दिल्लीत साजरा होणार; काय आहे जिना अन् मुस्लीम लीगशी कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 08:21 AM2024-03-06T08:21:37+5:302024-03-06T08:22:19+5:30

२४ मार्च १९४० रोजी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १९४१ मध्ये मुस्लिम लीगच्या घटनेचा भाग बनवण्यात आला. या प्रस्तावाच्या आधारे १९४६ मध्ये मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी दोन ऐवजी एक देश मागण्याचा निर्णय घेतला होता.

Pakistan National Day to be celebrated in Delhi; What is the connection with Jinnah and Muslim League? | पाकिस्तान नॅशनल डे दिल्लीत साजरा होणार; काय आहे जिना अन् मुस्लीम लीगशी कनेक्शन?

पाकिस्तान नॅशनल डे दिल्लीत साजरा होणार; काय आहे जिना अन् मुस्लीम लीगशी कनेक्शन?

नवी दिल्ली - Pakistan National Day in India ( Marathi News ) पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झालं आहे. शाहबाज शरीफ यांनी सोमवारी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शाहबाज शरीफ यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर शेजारील देश पाकिस्ताननेही भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाकिस्तान यावर्षी नवी दिल्लीत आपला 'राष्ट्रीय दिवस' साजरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या दिवशी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन दिल्लीत साजरा करण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने आपल्या राजदूताला परत बोलावले होते. पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन २३ मार्च रोजी असतो. स्वातंत्र्यापूर्वी लाहोरमध्ये जेव्हा पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, तेव्हाची ही तारीख आहे.

२३ मार्चला काय घडले?

२३ मार्च ही तारीख पाकिस्तानच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहे. ही तीच तारीख आहे जेव्हा १९४० मध्ये मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणारा प्रस्ताव मांडला होता. १९४० मध्ये लाहोर येथे २२ ते २४ मार्च या कालावधीत मुस्लिम लीगचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात संपूर्ण स्वायत्त आणि सार्वभौम मुस्लिम देश निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावात पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. पण नंतर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याला 'पाकिस्तान प्रस्ताव' असेही नाव पडले. या प्रस्तावात कुठेही वेगळा देश किंवा पाकिस्तान असा उल्लेख नव्हता. यामध्ये मुस्लिमबहुल भागांसाठी स्वायत्ततेची मागणी करण्यात आली होती.

त्यात लिहिलं होतं की, 'भौगोलिकदृष्ट्या संलग्न एक प्रदेश म्हणून ओळखली पाहिजेत, ते तयार करण्यासाठी, क्षेत्रे आवश्यकतेनुसार अशा प्रकारे समायोजित केली पाहिजेत की भारतातील उत्तर-पश्चिम आणि पूर्वेकडील भाग, जेथे मुस्लिम आहेत. केंद्रीत आहेत, संख्या मोठी आहे आणि ती गोळा करून 'स्वतंत्र राज्य' बनवले पाहिजे. यामध्ये समाविष्ट असलेले युनिट स्वतंत्र आणि स्वायत्त असतील. एवढेच नाही तर २३ मार्च १९५६ रोजी पाकिस्तानची राज्यघटनाही लागू झाली. या दिवशी पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक देश घोषित केले.

काय म्हणाले होते जिना?

जसवंत सिंग यांनी त्यांच्या 'जिना: इन द मिरर ऑफ इंडिया' या पुस्तकात लिहितात की, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये इतके मोठे आणि तीव्र मतभेद आहेत की केंद्र सरकारच्या अंतर्गत त्यांचे एकत्र राहणे गंभीर धोका निर्माण करू शकते असं मोहम्मद अली जिना यांनी लाहोरच्या अधिवेशनात म्हटले होते. पुस्तकानुसार, जिना म्हणतात, 'हिंदू आणि मुस्लिम हे दोन भिन्न धर्म, तत्त्वज्ञान, सामाजिक चालीरीती आणि साहित्याचे आहेत, ते एकमेकांशी लग्नही करत नाहीत आणि एकमेकांसोबत खात-पिऊही करत नाहीत. ते दोघेही भिन्न संस्कृतीशी संबंधित आहेत जे परस्परविरोधी विचार आणि विश्वासांवर आधारित आहेत.

तसेच हिंदू आणि मुस्लीम महाकाव्ये भिन्न आहेत, नायक भिन्न आहेत. अनेकदा एक नायक दुसऱ्याचा शत्रू असतो आणि असेच होते. भौगोलिकदृष्ट्या संलग्न भाग प्रदेशांमध्ये विभागल्याशिवाय मुस्लीम कोणतीही घटनात्मक योजना स्वीकारणार नाहीत किंवा अंमलात आणणार नाहीत. या प्रस्तावात वायव्येला पंजाब, उत्तर-पश्चिम सरहद्द प्रांत, सिंध, बलुचिस्तान, ईशान्येला बंगाल आणि आसाम यांचा समावेश असणारा मुस्लीम देश निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. २४ मार्च १९४० रोजी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १९४१ मध्ये मुस्लिम लीगच्या घटनेचा भाग बनवण्यात आला. या प्रस्तावाच्या आधारे १९४६ मध्ये मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी दोन ऐवजी एक देश मागण्याचा निर्णय घेतला होता.
 

Web Title: Pakistan National Day to be celebrated in Delhi; What is the connection with Jinnah and Muslim League?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.