पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, फारुख अब्दुल्ला पुन्हा बरळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 06:38 PM2017-11-15T18:38:57+5:302017-11-15T18:44:08+5:30
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरप्रश्नावरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरप्रश्नावरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी येथे एका कार्यक्रमात अब्दुल्ला म्हणाले, "कधीपर्यंत निरपराध लोकांच्या रक्ताचे पाट वाहत राहणार आणि कधीपर्यंत आम्ही पाकव्याप्त काश्मीर आमचे आहे म्हणून सांगत राहणार. काश्मीर यांच्या बापाचे नाही आहे."
"काश्मीरची विभागणी होऊन 70 वर्षे झाली. नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तान आहे आणि हे हिंदुस्तान आहे. 70 वर्षांत तो भाग हे परत मिळवू शकलेले नाहीत. तरीही आता पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग आहे म्हणून सांगताहेत,"असेही अब्दुल्ला पुढे म्हणाले.
Kab tak begunahon ka khoon behta rahega aur hum ye kehte rahenge ki wo hamara hissa hai? Wo inke baap ka hissa nahi hai. 70 saal ho gaye hain. Wo Pakistan hai, ye Hindustan hai aur 70 saal se ye usko haasil nahi kar sake. Aaj kehte hain ye hamara hissa hai: Farooq Abdullah in Uri pic.twitter.com/iabCHWaFCC
— ANI (@ANI) November 15, 2017
पाकव्याप्त काश्मीरवरून फारुख अब्दुल्ला यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केले होते."पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे. जम्मू-काश्मीर ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे तसेच पीओकेवर पाकिस्तानचा अधिकार आहे, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असल्यास आपल्याला पाकिस्तान बरोबर चर्चा करावी लागेल. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने दिनेश्वर शर्मा यांची निवड केली आहे. त्यांच्याबद्दल तुमचे मत काय ? असा प्रश्न फारुख अब्दुल्ला यांना काही दिवसांपूर्वी विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, मी यावर जास्त बोलू शकत नाही. त्यांनी काही जणांबरोबर चर्चा केली आहे पण फक्त चर्चेने तोडगा निघणार नाही. काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तानमध्ये आहे. भारत सरकारने पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे कारण काश्मीरचा काही भाग त्यांच्या ताब्यात आहे.
सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल
दोन वर्षांपूर्वी फारुख अब्दुल्ला म्हणाले होते कि, पाकिस्तानने व्यापलेले काश्मीर त्यांच्याकडेच राहणार आहे व भारताकडील काश्मीर आपल्याकडे राहणार आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू-काश्मीर कधीच एक होऊ शकणार नाहीत, हे मी राजकारणात आल्यापासून सांगत आलो आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याची ताकद आपल्यात नाही व आपले काश्मीर घेण्याचे बळ पाकिस्तानात नाही. आपल्याप्रमाणे तोही (पाकिस्तान) एक अण्वस्त्रधारी देश आहे. लष्कर तरी आपले किती संरक्षण करू शकेल. सर्व सैन्य जरी मदतीला आले तर ते दहशतवादी आणि बंडखोरांपासून आपला बचाव करू शकणार नाहीत. त्यामुळे (पाकिस्तानशी) चर्चा करून मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो, यावर त्यांनी भर दिला.