पाकव्याप्त काश्मीरने भारतात सामील व्हावे; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 10:07 AM2024-09-09T10:07:09+5:302024-09-09T10:07:41+5:30
या भागाचा इतका विकास होईल की, पाकव्याप्त काश्मीरचे लोक हे पाहून भारतात सामील होऊ इच्छितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जम्मू - पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेने भारतात सामील व्हावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. 'आम्ही तुम्हाला आपले मानतो, तर पाकिस्तान तुम्हाला विदेशी मानतो', असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त रामबन मतदारसंघात भाजप उमेदवार राकेशसिंह ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत राजनाथ सिंह बोलत होते.
कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीवर राजनाथ सिंह यांनी प्रखर टीका केली. जोवर भाजप आहे, तोवर हे अशक्य आहे, असे त्यांनी सुनावले. कलम-३७० रद्द केल्यापासून राज्यात होत असलेल्या बदलाचे स्वागत करून राजनाथ सिंह म्हणाले, येथील युवकांच्या हाती आता पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हरऐवजी लॅपटॉप कॉम्प्युटर आहेत, विकास हवा असेल, तर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले. या भागाचा इतका विकास होईल की, पाकव्याप्त काश्मीरचे लोक हे पाहून भारतात सामील होऊ इच्छितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री कुणाचा हे सांगणे अशक्य काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचा विजय झाला, तर मुख्यमंत्री दोघांपैकी कोणत्या पक्षाचा है भाकीत इतक्यात वर्तवता येणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांनी म्हटले. ही निवडणूक केवळ सरकार किवा नेत्यांचे पुनर्वसन करण्यापुरती मर्यादित नाही, असे ते म्हणाले.
हिंदू मतदारांना भीती दाखविण्याचा प्रयत्न
भाजपचे नेते जम्मू-काश्मीरमधील हिंदूमध्ये भीती पसरवू पाहत असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. या हेतूनेच भाजप नेत्यांनी जम्मूवर लक्ष केंद्रित केले आहे. आघाडी पुन्हा सत्तेत आली, तर प्रदेशात पुन्हा दहशतवाद बोकाळेल, अशी अनाठायी भीती पसरवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.