कुलभूषण जाधव यांना उद्या काऊन्सिलर अॅक्सेस मिळणार; पाकिस्तान नरमला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 04:18 PM2019-08-01T16:18:10+5:302019-08-01T16:32:18+5:30
भारताला आणखी एक दिलासा
Next
नवी दिल्ली: कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील विजयानंतर भारताला आणखी एक दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस मिळणार आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उद्या (शुक्रवारी) उद्या कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस देण्यात येईल.
Pakistani media: Pakistan offers consular access to Kulbhushan Jadhav tomorrow. (file pic) pic.twitter.com/M76cmyicYA
— ANI (@ANI) August 1, 2019
कुलभूषण जाधव यांना मिळणारा काऊन्सिलर अॅक्सेस भारतासाठी मोठा विजय आहे. कारण याआधी पाकिस्ताननं १५ पेक्षा जास्त वेळा जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस नाकारला आहे. भारतानं वारंवार विनंती करुनही पाकिस्ताननं जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस मिळू दिला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दणका दिल्यानंतर पाकिस्ताननं मवाळ भूमिका घेतली. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना भारताचे हेर सिद्ध करुन त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली.
दोनच आठवड्यांपूर्वी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला मोठा धक्का बसला. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं मेरिटच्या आधारे भारताच्या बाजूनं निकाल देत पाकिस्तानला दणका दिला. जाधव यांना काऊन्सिलर ऍक्सिस द्यायला हवा होता. मात्र तो त्यांना दिला गेला नाही, असं न्यायालयानं म्हटलं. यासोबतच पाकिस्ताननं जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, अशी सूचनादेखील न्यायालयानं केली. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार होईपर्यंत त्यांना दिलेली शिक्षा स्थगित करण्यात येईल. याशिवाय पाकिस्ताननं जाधव यांना काऊन्सिलर ऍक्सिस द्यावा, अशी स्पष्ट सूचना न्यायालयानं केली होती.