पाकिस्तानातील पेशावरमध्ये आत्मघाती हल्ला; 14 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 08:16 AM2018-07-11T08:16:01+5:302018-07-11T08:17:36+5:30
अवामी नॅशनल पार्टीच्या बैठकीत आत्मघाती हल्ला
पेशावर: पाकिस्तानातील पेशावरमध्ये मंगळवारी रात्री आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 65 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या लेडी रीडिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवामी नॅशनल पार्टीची बैठक सुरू असताना झालेल्या स्फोटात या स्फोटात नेते हारुन बिल्लौर यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. हारुन बिल्लौर यांची कार्यकर्त्यांसह बैठक सुरू असताना हा आत्मघाती हल्ला झाला. त्यावेळी तिथे 300 हून अधिक जण उपस्थित होते.
या स्फोटात बिल्लौर गंभीर जखमी झाले. त्यांना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या हल्ल्यासाठी कमीतकमी 12 किलोंची स्फोटकं वापरण्यात आल्याची माहिती बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकातील वरिष्ठांनी दिली. हारुन बिल्लौर यांचे वडील बशीर अहमद बिल्लौर यांचाही 2012 मध्ये पेशावरमधील पक्ष कार्यालयातील आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाला होता. बशीर अहमद कार्यकर्त्यांची बैठक घेत असताना हा हल्ला झाला. तालिबाननं हा हल्ला घडवून आणला होता.