भारतानं कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर द्या; इम्रान खान यांचे सैन्याला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 09:59 PM2019-02-21T21:59:52+5:302019-02-21T22:01:29+5:30
इम्रान खान यांची लष्करप्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा
इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्कराला पूर्ण सूट दिली आहे. भारतीय सैन्यानं कारवाई केल्यास पाकिस्तानी सैन्यानं जशास तसं उत्तर द्यावं, असे आदेश खान यांनी लष्कराला दिले आहेत. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना जम्मू-काश्मीरमध्ये तयार करण्यात आली होती, असंदेखील त्यांनी म्हटलं.
पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला पूर्णपणे सूट दिली असल्याचं एका रॅलीला संबोधित करताना म्हटलं होतं. आता कारवाईची वेळ आणि ठिकाण लष्कर ठरवेल, असं मोदी जाहीरपणे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी आज लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या आधी ही चर्चा झाल्याचं वृत्त एआरवाय न्यूजनं दिलं. खान आणि बाजवा यांच्यात देश आणि त्याच्या आसपासचा भाग यांची सुरक्षेवर चर्चा झाली. पुलवामातील हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध हे चर्चेचे मुख्य विषय होते.
At the same time, the Prime Minister authorized Armed Forces of Pakistan to respond decisively and comprehensively to any aggression or misadventure by India.
— PTI (@PTIofficial) February 21, 2019
इम्रान खान आणि कमर जावेद बाजवा यांच्यातील चर्चा संपल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. खान या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यामध्ये बाजवा, गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर, संरक्षणमंत्री परवेज खटक, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी, गृह राज्यमंत्री शहरयार आफ्रिदी यांच्यासह काही वरिष्ठ नेतेही बैठकीला हजर होते. या बैठकीत कुलभूषण जाधव प्रकरणावरदेखील चर्चा झाली. सध्या या प्रकरणावर हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू आहे.