लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 10:14 AM2019-03-27T10:14:51+5:302019-03-27T10:19:24+5:30
निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं.
इस्लामाबाद: भारतात लोकसभेची निवडणूक होईपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहतील, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. निवडणूक होण्याआधी आणखी काहीतरी घडू शकतं, असा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीआधी पुलवामासारखा आणखी एखादा हल्ला घडवला जाईल, असं भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवलं होतं.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामात 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. याचाच संदर्भ देत भारत-पाकिस्तानवर अद्यापही युद्धाचं सावट कायम असल्याचं खान म्हणाले. 'निवडणुकीआधी मोदी सरकार आणखी काहीतरी करू शकतं,' अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. 'धोका अद्याप टळलेला नाही. भारतात निवडणूक होईपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण राहील. भारताकडून आक्रमण झाल्यास ते थोपवून धरण्यासाठी आम्ही तयार आहोत,' असं इम्रान खान यांनी म्हटलं.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. हवाई दलाच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानातील बालाकोटवर बॉम्ब टाकले. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानं ही धाडसी कारवाई केली. यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र यामध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती हवाई दलानं दिली नाही. काँग्रेससह तृणमूल काँग्रेसनं या कारवाईचे पुरावे मागितल्यानं राजकारण तापलं होतं.