पाकिस्तानात भारतीय गायकाचे गाणे गुणगुणले, दोन वर्ष पगारवाढ अन् भत्ते नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 12:46 PM2018-09-04T12:46:06+5:302018-09-04T12:47:56+5:30
येथील विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने 25 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक
नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये विमानतळावरील एका महिला कर्मचाऱ्याने भारतीय गायकाचे गाणे गुणगुणल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याने ही कारवाई केली. त्यानुसार, या महिला कर्मचाऱ्यास दोन वर्षांसाठी कुठलीही वेतनवाढ किंवा अधिकचे भत्ते मिळणा नाहीत. पाकिस्तानमधील विमानतळ प्रशासनाच्या या अजबगजब कारवाईमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
येथील विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने 25 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्याने या महिला कर्मचाऱ्यास दिले आहेत. या महिला कर्मचाऱ्याने पंजाबी गायक गुरू रंधावा यांचे 'हाय रेटेड गबरू' हे गाणे गायले होते. हे गाणे गातेवेळी या महिला कर्मचाऱ्याने पाकिस्तानी झेंडा असलेली टोपी परिधान केली होती. या महिलेचा गाणे गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश देत महिला कर्मचाऱ्यावर ही कारवाई केली. दरम्यान, ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही भारताबद्दल प्रेम दाखवताच पाकिस्तानी नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यापूर्वी 2016 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतूक केल्यामुळे आणि आपल्या घरावर भारतीय ध्वज फडकवल्याने एका पाकिस्तानी नागरिकाला 10 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.