पाकची नवी खेळी; LoCजवळ 7 लाँच पॅड, 275 जिहादी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:33 PM2019-09-11T12:33:00+5:302019-09-11T12:34:04+5:30
एलओसी (LoC) जवळ पाकिस्तानने दहशतवादी तळ सुरू केल्याची खळबळजनक माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चीनचा सहारा घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताविरोधात कट रचण्याच्या प्रयत्नात आहे. एलओसी (LoC) जवळ पाकिस्तानने दहशतवादी तळ सुरू केल्याची खळबळजनक माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
एलओसीजवळ पाकिस्ताने सात दहशतवादी लाँच पॅड सुरू केले आहेत. तसेच, 275 जिहादी सक्रिय आहेत. याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अफगाण आणि पश्तून सैनिकांना देखील एलओसीजवळ तैनात करण्यात आले आहे.
एका गुप्तहेर सुत्राने सांगितले की, पाकिस्तानकडून याआधीही सीमेपार दहशतवादी कारवायांसाठी अफगाण आणि पश्तून जिहादींचा वापर करण्यात आला आहे. याआधी 1990 मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये हिंसा भडवण्यासाठी आणि दहशतवाद वाढवण्यासाठी परदेशी जिहादींचा वापर केला होता.
1990मध्ये पाकिस्तानने सर्वात आधी जिहादींचा वापर सीमेपार भारताविरोधात दहशतवाद पसरवण्यासाठी केला होता. भारताविरोधात काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी युद्ध छेडण्यासाठीच पाकिस्तानने हा प्रयत्न केला होता. भारताने याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने आपल्या रणनीतीत बदल केला. आता पाकिस्तान पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांचाच काश्मीरमध्ये हिंसा भडकवण्यासाठी वापर करत आहे.
दरम्यान, यासंबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या हाती लागली आहेत. या कागदपत्रावरुन असे समजते की, पाकिस्तानी सेना आणि आयएसआय मिळून भारताविरोधात षडयंत्र आखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. एलओसीजवळ पाकिस्तान जास्तीत जास्त दहशतवाद्यांना तयार करत आहे. तसेच, लाँचिंग पॅड तयार करण्याचे काम सुरु आहे. उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमधून पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहे.