आॅपरेशन प्लॅनसह पाकिस्तान सज्ज!
By admin | Published: September 24, 2016 05:42 AM2016-09-24T05:42:11+5:302016-09-24T05:42:11+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता पाकिस्तान सैन्य आॅपरेशनसाठी सज्ज झाले आहे
नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता पाकिस्तान सैन्य आॅपरेशनसाठी सज्ज झाले आहे. भारतातील लक्ष्यही त्यांनी निश्चित केले आहे. जिओ टीव्हीने सांगितले की, सीमेपलीकडील आक्रमक कारवाईसाठी तयारी करण्यात आली आहे.
सैन्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार आहे. भारताच्या कोणत्याही सैन्य आव्हानाला तोंड देण्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. आॅपरेशन प्लॅन तयार आहे. लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सैन्याना हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारताला आपल्या क्षमतांची पूर्ण जाणीव आहे, तर पाकिस्तान सीमेपलीकडच्या आव्हानांचा सामना कशाप्रकारे करू शकतो, याचीही जाणीव आहे. भारताकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला कसे तोंड द्यायचे, याची तयारी पाकिस्तानने केली आहे.
उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. यात १८ जवान शहीद झाले, तर भारताने पाकिस्तानच्या चार अतिरेक्यांना ठार मारले होते. भारताकडून मर्यादित, पण दंडात्मक कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. थेट युद्धाचा पर्याय जरी निवडला नाही तरी सीमापार दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले जाऊ शकतात. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शब्द दिला आहे की, उरीतील हल्लेखोरांवर निश्चित कारवाई केली जाईल.
पाकिस्तानने उत्तर भागात नो फ्लाय झोन जाहीर केला आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानातील
एका पत्रकाराने टिष्ट्वट करून सांगितले होते की, इस्लामाबादवर एफ १६ विमाने घिरट्या घालत आहेत. कदाचित, हा सराव असल्याचे सांगितले जात आहे. (वृत्तसंस्था)
>रशियन लष्कराचा पाकिस्तानात सराव
रशियन लष्कराच्या यंत्रसज्ज पायदळ तुकडीचे शुक्रवारी पाकिस्तानात संयुक्त लष्करी सरावासाठी आगमन झाले. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या सरावाला ‘मैत्री-२०१६’ असे नाव देण्यात आले असून अशा प्रकारचा सराव हा प्रथमच होत आहे. शीतयुद्धाच्या काळात रशिया आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शत्रू होते आता मात्र उभयतांत लष्करी सहकार्य वाढताना दिसत आहे.
>विमानाचे लँडिंग रस्त्यावर
त्या पाठोपाठ हवाई दलाच्या विमानाचे लॅडिंग करण्यासाठी पाकिस्तानमधील मुख्य हायवे बंद ठेवण्यात आले होते, असे वृत्त आले आहे. उरी हल्ल्यानंतर परिस्थिती चिघळल्याने हा सराव करण्यात येत नसून, नियमित प्रशिक्षणाचा भाग असल्याने लॅडिंगचा सराव करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांच्या या सरावासाठी इस्लामाबाद ते लाहोरदरम्यानची वाहतूकही जुन्या रस्त्याने वळवण्यात आली होती.
धावपट्या खराब झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून हायवेंवर लॅडिंगचा सराव केला जात आहे. गेली अनेक वर्ष हा सराव करत आहोत, असे पाकिस्तान हवाई दलाचे प्रवक्ते जावेद मोहम्मद अली यांनी सांगितले. उरी हल्ल्यानंतर भारत हल्ला करेल. या भीतीने आम्ही हा सराव करत नाही आहोत. हल्ला आणि सरावाची वेळ एकत्र येणे हा योगायोग आहे, असेही जावेद मोहम्मद अली म्हणाले.