काश्मीरमध्ये मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन पाकिस्तान समर्थनाचे आणि भारत विरोधी नारे
By Admin | Published: July 11, 2016 08:41 AM2016-07-11T08:41:28+5:302016-07-11T08:41:28+5:30
हिंसाचार सुरु असलेल्या काश्मीर खो-यातील मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन पाकिस्तान समर्थनाचे आणि भारता विरोधी नारे दिले जात आहेत.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ११ - हिंसाचार सुरु असलेल्या काश्मीर खो-यातील मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन पाकिस्तान समर्थनाचे आणि भारता विरोधी नारे दिले जात आहेत. सुरक्षा पथकांना भिडण्याचे आणि भारत विरोधी जिहादमध्ये सहभागी होण्याचे युवकांना खुले आवाहन केले जात आहे.
एक प्रकारे मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन हिंसाचारासाठी जाहीर चिथावणी दिली जात आहे. जिहादच्या मार्गाने काश्मीरला भारतापासून आझादी मिळेल अशा चिथावणी देणा-या ऑडीयो कॅसेटस ऐकवल्या जात आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला आहे.
दोन दिवसात विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २२ जण ठार झाले आहेत. रविवारी जमावाने पोलिसांची गाडी झेलम नदीत ढकलून दिली. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला. रविवारी एकूण पाचजण ठार झाले.
पाकिस्तानशी संबंधित असणा-या काही जणांकडे हिंसाचारा होतो त्यावेळी भारत विरोधी भावना भडकवण्यासाठी असे साहित्य तयार असते असे गुप्तचर अधिका-यांनी सांगितले. काश्मीर खो-यातील मशीदींमधून भारत विरोधी नारे देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.