भारतामध्येही झालं होतं ट्रेनचं अपहरण, प्रवाशांना धरलं होतं ओलीस, अखेरीस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 21:01 IST2025-03-11T21:01:14+5:302025-03-11T21:01:50+5:30
Pakistan Train Hijack: पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी एका प्रवासी ट्रेनचं अपहरण केल्याने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारतामध्येही अशा प्रकारे काही वेळा प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचं अपहरण झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

भारतामध्येही झालं होतं ट्रेनचं अपहरण, प्रवाशांना धरलं होतं ओलीस, अखेरीस...
पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी एका प्रवासी ट्रेनचं अपहरण केल्याने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. तसेच दहशतवाद्यांनी ओलीस धरलेल्या प्रवाशांमध्ये पाकिस्तानी लष्करातील सैनिक आणि अधिकारी असल्याने पाकिस्तान सरकराच्या तोंडचं पाणी पळालं आहे. दरम्यान, ट्रेनचं अपहरण होण्याची ही काही पहिलीच घटना नाही आहे. भारतामध्येही अशा प्रकारे काही वेळा प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचं अपहरण झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
यातील एक घटना ६ फेब्रुवारी २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी मुंबई-हावडा मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचं अपहरण झालं होतं. या अपहरणाचा उद्देश जयचंद वैद्य अपहरणकांडातील आरोपी उपेंद्र सिंह उर्फ कबरा याची सुटका करणं हा होता. २००१ मध्ये व्यापारी जयचंद वैद्य यांच्या झालेल्या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांनी उपेंद्र सिंह उर्फ कबरा याला मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. तुरुंगातून फरार झालेल्या काबरा याने जनशताब्दी एक्स्प्रेसला जवळपास १३ किलोमीटरपर्यंत ओलीस धरले होते. अखेर लष्कराच्या मदतीने ट्रेनमधून प्रवासांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.
सन २००९ मध्ये सशस्त्र माओवाद्यांनी भुवनेश्वर-राजधानी एक्स्प्रेसचं अपहणर केलं होतं. तेव्हा सुमारे ३०० ते ४०० माओवाद्यांनी संपूर्ण ट्रेनच ताब्यात ठेवली होती. शेकडो प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी हे अनेक तासांपर्यंत ताब्यात राहिले होते. या अपहरणकांडांमध्ये छत्रधर नावाच्या माओवाद्याचं नाव समोर आलं होतं. त्याच्या इशाऱ्यावर हे अपहरणकांड घडवण्यात आलं होतं. माओवादी नेत्याच्या सुटकेसाठी प्रवाशांना ओलीस धरण्यात आलं होतं. यादरम्यान, प्रवशांना मारहाण करून लुटालूट करण्यात आली होती.
तर जून २०१३ मध्ये माओवाद्यांनी बिहारमधील जमुई येथे गोळीबार करून ट्रेनवर ताबा मिळवला होता. तेव्हा धनबाद-पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेसला अनेक तासांपर्यंत अपहरण करून ताब्यात ठेवले होते. माओवाद्यांना ड्रायव्हरला ओलीस धरत संपूर्ण ट्रेनवर ताबा मिळवला होता. त्यानंतर त्यांनी प्रवाशांची लुटालूट केली होती.