पाकिस्तान मृत्यूचा सापळा आहे, तिथे जाणे सोपे पण परतणे अशक्य - उज्मा
By admin | Published: May 25, 2017 05:16 PM2017-05-25T17:16:28+5:302017-05-25T17:43:53+5:30
पाकिस्तान मृत्यूचा सापळा आहे. तिथे जाणे सोपे आहे पण तिथून परतणे जवळपास अशक्यच आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - पाकिस्तान मृत्यूचा सापळा आहे. तिथे जाणे सोपे आहे पण तिथून परतणे जवळपास अशक्यच आहे. पाकिस्तानात महिलाच काय, पुरुषही सुरक्षित नाहीत असा शब्दात पाकिस्तानातून परतलेल्या उज्मा अहमदने आपला अनुभव कथन केला. बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडण्यात आलेली उज्मा आज मायदेशी परतली. बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्माला मायदेशी परतण्याची परवानगी दिली होती, तसेच पोलिसांना तिला वाघा सीमेपर्यंत सोडण्याचे आदेश दिले होते.
भारतात परतल्यानंतर उज्माने आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उज्माने तिचा अनुभव कथन केला. विवाह करुन पाकिस्तानात गेलेल्या महिलांना मी पाहिले आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. प्रत्येक घरात एका पुरुषाला दोन-तीन, चार बायका असतात. आणखी काही दिवस मी तिथे राहिले असते तर, माझा मृत्यू झाला असता. फिलिपाईन्स, मलेशिया या देशातून महिलांना प्रेमामध्ये फसवून पाकिस्तानात आणले जाते. अशा अनेक महिला आज पाकिस्तानमध्ये अडकल्या आहेत असे उज्माने सांगितले.
उज्माने तिची सुटका केल्याबद्दल भारतीय दूतावासाला धन्यवाद दिले. भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मी आभार मानते. त्यांनी मला आशा आणि जगण्याला कारण दिले. मला मिळालेल आयुष्य अमुल्य आहे याची मला त्यांनी जाणीव करुन दिली. त्यामुळे मी परिस्थितीशी लढाई करु शकले असे उज्माने सांगितले. भारतीय दूतावासात जाऊन माझी परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी लगेच माझ्यावर विश्वास ठेवला ही मोठी गोष्ट आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मला हिम्मत दिली. त्यांच्यामुळे आज मी सुरक्षित, सुखरुप असून तुमच्याशी बोलू शकतेय असे उज्मा अहमदने सांगितले.
पाकिस्तानी नागरिक ताहिर अलीने बळजबरीने उज्माशी लग्न केले होते. मायदेशी परतू दिले जात नसल्यामुळे उज्माने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेतला होता. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उज्माचे स्वागत केले. आतापर्यंत ज्या त्रासाला सामोरं जाव लागलं त्यासाठी माफीही मागितली. लग्नास भाग पाडल्याने उज्माने पतीविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीच्यावेळी उज्माने ताहीरला भेटण्याची आपल्याला अजिबात इच्छा नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायाधीशांनी उज्माला भारतात परतण्याची परवानगी दिल्यानंतर तिला आपल्या चेह-यावरचा आनंद लपवता आला नाही.
उज्माच्या जीवाला धोका असल्याने ती इस्लामाबादमधील भारतीय दूतावासामध्ये राहत होती. जो पर्यंत भारतात परतण्याची परवानगी मिळणार नाही तो पर्यंत तिने दूतावास सोडण्यास नकार दिला होता. पाकिस्तानातील पतीनं भारतीय उच्चायुक्तालयावरच भारतीय पत्नीला ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. आम्ही दोघेही व्हिसा घेण्यासाठी भारतीय दूतावासात गेलो होतो. त्यावेळी पत्नी अचानक बेपत्ता झाली, असं ताहीरने सांगितले होते.
आणखी वाचा
उज्मा आणि ताहिर अली यांची ओळख मलेशियामध्ये झाली होती. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर उज्मा 1 मे रोजी वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाली आणि त्यांनी 3 मे रोजी निकाह केला. मात्र पाकिस्तानी वृत्तपत्र न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, दोघे जण उच्चायुक्तालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःचा व्हिसा फॉर्म आणि फोन अधिका-यांकडे सुपूर्द केला.
अधिका-यांनी बोलावल्यानंतर उज्मा बिल्डिंगच्या आत गेली, तिचा पती त्यावेळी बाहेरच होता. ब-याच वेळ झाला तरी उज्मा न आल्यानं अखेर पतीनं बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. मात्र भारतीय उच्चायुक्तालयानं उज्मा इथे नसल्याचं सांगितलं. तसेच अधिका-यांनी त्यांचे तीन मोबाईल फोनही परत केले नाहीत.
पाकिस्तानचे मानले आभार
उज्मा प्रकरणात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचेही आभार मानले आहेत. पाकिस्ताननेही मदत केल्यामुळे उज्माची भारतवापसी शक्य झाल्याचे सुषमा स्वराज सांगितले.