पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
By admin | Published: September 7, 2016 04:41 AM2016-09-07T04:41:21+5:302016-09-07T04:41:21+5:30
पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या पूंछ क्षेत्रात मंगळवारी उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
जम्मू : पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या पूंछ क्षेत्रात मंगळवारी उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे.
पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मध्यरात्री कोणत्याही चिथावणीविना नियंत्रण रेषेजवळील भारतीय लष्करी चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, असे लष्करी प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले. पाकिस्तानी लष्कराने पूंछ क्षेत्रात उखळी तोफांचा मारा करण्यासह छोटी शस्त्रे आणि स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला. आमच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय लष्कराची कोणतीही हानी झाली नव्हती. नियंत्रण रेषेवर अजूनही गोळीबार सुरू आहे, असे हा प्रवक्ता म्हणाला. शाहपूर कंदी भागात मधूनमधून गोळीबार होत आहे. आठवडाभरात शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची ही दुसरी वेळ आहे. २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी लष्कराने जम्मू जिल्ह्याच्या अखनूर क्षेत्रात गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. याच्या आधी १४ आॅगस्ट २०१६ रोजी पाक लष्कराने दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले होते. (वृत्तसंस्था)
भारतीय राजदूतांचा पाकला सल्ला
इस्लामाबाद : काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. पाकिस्तानने इतर देशांच्या प्रश्नांत नाक खुपसण्याआधी स्वत:च्या समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला भारताचे पाकिस्तानातील राजदूत गौतम बंबावाले यांनी पाकला दिला. काचेच्या घरांत राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगडफेक करू नये, असेही ते म्हणाले.
काश्मीर मुद्दा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानबाबत अलीकडेच केलेल्या विधानांवरील प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये समस्या आहेत. इतर देशांच्या समस्यांत लक्ष घालण्यापूर्वी तुम्ही (पाकिस्तान) तुमच्या समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्यांनी सांगितले.