पाककडून सलग सातव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय सैन्याने दिले जशास तसे उत्तर
By देवेश फडके | Published: January 18, 2021 10:44 AM2021-01-18T10:44:04+5:302021-01-18T10:45:50+5:30
जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पूँछ जिल्ह्यांतील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही याला चोख उत्तर दिले आहे.
जम्मू :जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पूँछ जिल्ह्यांतील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही याला चोख उत्तर दिले आहे. 'एएनआय'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. सलग सातवेळा नियंत्रण रेषेवरील दिगवार आणि माल्टी सेक्टर येथील भारतीय सैन्याच्या चौक्या आणि रहिवासी भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. रविवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला. यामुळे रहिवासी भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले गेले.
Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire in Balakote sector in Poonch district at 2230 hours.
— ANI (@ANI) January 17, 2021
पाकिस्तानच्या कृत्याला भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी रात्री उशिराही पाकिस्तकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, नववर्ष २०२१ च्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एका जवानाला हौतात्म्य आले. भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचा एक सैनिक मारला गेला. गतवर्षी सन २०२० मध्ये पाकिस्तानकडून तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.