पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ताबारेषेवर जोरदार गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 07:48 PM2018-08-20T19:48:43+5:302018-08-20T19:54:43+5:30
श्रीनगर : एकीकडे काश्मीरप्रश्नावर अखंड चर्चा हवी असल्याचे पाकिस्तानकडून सांगितले जात असतानाच आज घुसखोरीचा प्रयत्न फसल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे.
गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानच्या बाजुने दहशतवादी मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न करत आहेत. सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यातील कमलकोट क्षेत्रामध्य जोरदार गोळीबार करण्यात आला. यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. याचबरोबर पाक सैन्याने 120 एमएम उखळी तोफांचा माराही केला. पाकच्या या आगळीकीला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन दिवसांपूर्वीच कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकने गोळीबार केला होता.
भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान भारतीय जवानांचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न करत असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. रविवारी दहशतवाद्यांच्या एका गटाने नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला होता. याआधी शनिवारी कुपवाडा जिल्ह्यात केलेल्या कारवाईत घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.