पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, चार जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 10:19 PM2018-02-04T22:19:00+5:302018-02-04T22:28:00+5:30
जम्मू-कश्मीरमध्ये सीमा भागातील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे
जम्मू कश्मीर - जम्मू-कश्मीरमध्ये सीमा भागातील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे. बिंभरगली येथे झालेल्या गोळीबारात एक अधिकारी व तीन जवान शहीद झाले आहेत. शहीदांची नावे अद्याप कळली नाहीत. सध्या नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची माहिती श्रीनगरच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आज रविवारी सकाळपासूनचं पाकिस्तानकडून भारताच्या चौक्यांवर गोळीबार सुरू केला होता, अजूनही तो सुरू आहे. पुंछ जिल्ह्यातील सीमेवरील अग्रिम चौकीवर आणि शाहापूर चौकीवर सकाळी तर संध्याकाळी राजौरीच्या मंजाकोट सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार आणि मोर्टार हल्ला करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून शाहपूर परिसरातील सीमेवर भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करण्यासाठी ही फायरिंग करण्यात आल्याचं बोललं जातंय. भारतीय जवान यांचा प्रयत्न हाणून पाडत आहेत.
शहीद जवानांमध्ये कॅप्टन कपील कूंडू, जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल यांचा समावेश आहे. तर, लांस नायक इकबाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले आहेत.