जम्मू काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका महिलेचा मृत्यू

By admin | Published: May 11, 2017 07:38 AM2017-05-11T07:38:13+5:302017-05-11T08:47:55+5:30

पाकिस्तानानं जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टर येथे केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी आहे.

Pakistan violates ceasefire in Jammu Kashmir, death of a woman | जम्मू काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका महिलेचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका महिलेचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 11 - पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.  जम्मू काश्मीरमधील राजौरी गार्डन येथील नौसेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. "एएनआय" या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पहाट 3.38 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाल्याची माहिती समोर आली. या गोळीबार एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.
 
भारताकडून अनेक इशारे देण्यात आल्यानंतरही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच दिसत आहे. सीमारेषेवरील हल्लेदेखील दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. 
 
दरम्यान,  सहा महिन्यांपूर्वीच लष्करात रूजू झालेले आणि काश्मीरमध्ये रोल मॉडेल बनलेले तरुण लेफ्टनंट उमर फय्याज (वय 22) यांची दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली. नातेवाईकाच्या लग्नासाठी ते सुट्टी घेऊन शोपियान जिल्ह्यात आले होते. त्यानंतर ही घटना घडली. त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर दूर त्यांचा मृतदेह आढळला. उमर यांच्या हत्येमुळे स्थानिक रहिवाशांत तीव्र संताप व्यक्त होत असून, मारेकऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
(तरुण लष्करी अधिकाऱ्याची काश्मिरात अपहरण करून हत्या)
 
उमर फय्याज हे रजा घेऊन शोपियान जिल्ह्यात लग्न समारंभाला उपस्थित राहण्यास आले असताना, अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली. उमर हे सूरसोना (जि. कुलगाम) खेड्यातील श्रीनगर येथून ७४ किलोमीटरवरील बटापुरा येथे त्यांच्या मामेबहिणीच्या लग्नाला गेले होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांचे अतिरेक्यांनी अपहरण केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
अतिरेक्यांनी उमर यांच्या कुटुंबीयांना धमकी दिल्यामुळे त्यांनी त्यांचे अपहरण झाल्याचे पोलिसांना सांगितले नाही. गोळ्या घालून ठार मारल्याचा उमर यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून तीन किलोमीटरवरील हार्मेन भागात बुधवारी सकाळी आढळला. अपहरणकर्त्यांना उमर यांनी प्रतिकार केल्याचे शवविच्छेदन अहवालातून दिसते, असे अधिकारी म्हणाले. खूप जवळून त्याचे डोके, पोट किंवा छातीच्या भागात गोळ्या झाडण्यात आल्या. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार चेहरा झाकलेल्या दोघांनी त्याच्या घरात प्रवेश केला व उमर यांना ‘आमच्यासोबत चल’, असे म्हटले. त्यावेळी फय्याज नि:शस्त्र होते.
 
फय्याजचे अपहरण झाले असले तरी त्याची सुटका होईल अशी आशा आम्हाला होती, त्यामुळे आम्ही अपहरणाची माहिती कोणालाही दिली नाही, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. या भागात पोलिसांबाबत तसे (अपहरणानंतर सुटका) घडले होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 
उमर फय्याजचा संपूर्ण लष्करी सन्मानाने दफनविधी करण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेला अनेक लोक आले होते. यावेळीही काश्मिरी तरुणांनी जम्मू आणि पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी उमर यांना अखेरची सलामी दिल्यानंतर लगेच दगडफेकही सुरू झाली.
 
पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील १२९ व्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. दक्षिण काश्मीरमधील अशमुकुम येथील सरकारी नवोदय विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले होते. फय्याज यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्यासाठी मेजर जनरल बी. एस. राजू यांनी त्यांच्या सगळ्या शाखांना आदेश दिले आहेत. संपूर्ण लष्कर या कठीणप्रसंगी फय्याज यांच्या कुटुंबियांसोबत आहे, असे लेफ्टनंट व राजपुताना रायफल्सचे कर्नल अभय कृष्ण म्हणाले.
 
जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी उमर फय्याजच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उमर फय्याज यांच्या हत्येचा निषेध केला आहे. संपूर्ण देश फय्याज यांचे कुटुंब, मित्र आणि सहकारी यांच्या दु:खात सहभागी आहे. माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत असल्याचे गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फय्याज यांच्या हत्येचा निषेध केला. तेथील परिस्थिती खूपच वाईट आणि केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावी अशी आहे, असे ते म्हणाले.
 
शिक्षा करण्याचा लष्कराचा निर्धार
तरुण काश्मिरी लेफ्टनंट उमर फय्याज यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा करण्याचा निर्धार बुधवारी लष्कराने केला. फय्याज यांच्या हत्येच्या घटनेने काश्मीर खोऱ्यात लोक दहशतवादाविरोधात निर्णायकरीत्या उभे राहतील, असे लेफ्टनंट अभय कृष्णा यांनी म्हटले. 
 
हे भ्याड कृत्य -
उमर फय्याज यांचे अपरहण आणि हत्या हे भ्याड कृत्य आहे. उमर हे जम्मू आणि काश्मीरमधील आदर्श होते. काश्मीरमधील तरुणांना ते स्फूर्ती देतील. - अरुण जेटली, संरक्षणमंत्री
 

Web Title: Pakistan violates ceasefire in Jammu Kashmir, death of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.