कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात दोघांचा मृत्यू, 9 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 09:03 AM2017-10-02T09:03:19+5:302017-10-02T13:48:07+5:30

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सोमवारी (2 ऑक्टोबर) सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले.

Pakistan violates ceasefire in Keri and Digwar areas of Poonch | कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात दोघांचा मृत्यू, 9 जण जखमी

कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात दोघांचा मृत्यू, 9 जण जखमी

Next

श्रीनगर - सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सोमवारी (2 ऑक्टोबर) सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून पूंछ सेक्टरमधील कसाबा परिसरात तुफान गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं. मात्र,  पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कसाबा परिसरातील एक 10 वर्षांचा मुलगा आणि दिगवार सेक्टरमधील एक मुलगीचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याशिवाय कुपवाडाच्या तंगधारमध्ये 5 ते 7  संशयित दहशतवादी घुसल्याची माहितीही समोर आली आहे. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवानांना एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यशदेखील आले आहे.  
पाकिस्ताननं पूंछ सेक्टरमधील केरन परिसरात सकाळी 6.30 वाजण्याच्या शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. पाकिस्ताननं भारतीय लष्कराच्या चौक्या आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करत तुफान गोळीबार केला. 

दरम्यान, 27 सप्टेंबरला सकाळीदेखील पाकिस्तानकडून भीमबेर गली आणि पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळीदेखील पाकिस्ताननं सीमा रेषेजवळील भारतीय लष्कराच्या चौक्या आणि निवासी परिसरांना टार्गेट करत गोळीबार केला.  

भारतीय जवानांनी पाकच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा हल्ल्याचा उधळला कट 
केरान सेक्टरमधील भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा प्रयत्न मंगळवारी ( 26 सप्टेंबर ) भारतीय जवानांनी उधळून लावला. पाकिस्तानच्या बॅट फोर्सचे सात ते आठ सशस्त्र सैनिक भारतीय लष्कराच्या चौकीजवळ आले होते.  त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायर देण्यात येत होती. भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि मोर्टारचा मारा करण्यात येत होता. भारतीय चौकी उद्ध्वस्त करण्याच्या हेतून बॅट फोर्सचे सैनिक आले होते. पण सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी त्यांचा कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत भारताच्या बाजूनं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न पाडला हाणून 
तर दुसरीकडे मंगळवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टर परिसरातही नियंत्रण रेषेवरजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट भारतीय लष्करानं उधळून लावला. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडत एका दहशतावाद्याला यमसदनी धाडण्यातही जवानांना यश आले.  लष्कराच्या एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरच्या झोरावर क्षेत्रात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला व एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दरम्यान, चकमक घडलेल्या स्थळावरुन एक हत्यारदेखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती या अधिका-यानं दिली आहे. 
 

लष्कराने केला खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा 
तर दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी ( 27 सप्टेंबर ) भारतीय लष्कराने एका खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा केला. लष्कर-ए-इस्लामचा प्रमुख अब्दुल कय्युम नजरला सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातले. उरी सेक्टरमध्ये सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. सुरक्षा पथकांना मिळालेलं हे मोठं यश आहे. 50 पेक्षा जास्त हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. गेल्या 17 वर्षांपासून अब्दुल नजर काश्मीर खो-यात सक्रीय होता. 

उरीमधल्या लाचीपोरामधून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना सुरक्षा पथकांनी त्याला कंठस्नान घातले. आज सकाळी नियंत्रण रेषेजवळ लाचीपोरा येथे सुरक्षा पथकांनी घुसखोरीचा कट उधळून लावला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला अशी माहिती बारामुल्लाचे एसएसपी इम्तियाज हुसैन यांनी दिली. काश्मीरमधील टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे त्याच्याकडे लष्कर-ए-इस्लाम पुर्नजिवित करण्याची जबाबदारी दिली होती. 

हिजबुल मुजाहिद्दीनमधून फुटून बाहेर पडलेल्या लष्कर-ए-इस्लामचे तो नेतृत्व करत होता. 43 वर्षीय अब्दुल नजर सोपोरचा राहणार होता. तो पाकिस्तानातही जाऊन आला होता. गावच्या सरपंचासह अनेक हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. वयाच्या 16 व्या वर्षापासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. काश्मीरमधल्या अनेक मोबाईल टॉवरवरील हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यामुळेच त्याला मोबाइल टॉवर हे टोपण नाव देण्यात आले होते. 








Web Title: Pakistan violates ceasefire in Keri and Digwar areas of Poonch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.