पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By Admin | Published: October 26, 2015 11:34 PM2015-10-26T23:34:23+5:302015-10-26T23:34:23+5:30
पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सांबा आणि कथुआ जिल्ह्णांमधील ३० सीमा चौक्या आणि अनेक नागरी वस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला
जम्मू : पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सांबा आणि कथुआ जिल्ह्णांमधील ३० सीमा चौक्या आणि अनेक नागरी वस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला. यात एक गावकरी जखमी झाला आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी रात्री ७ वाजेपासून सांबा आणि कथुआ जिल्ह्णातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांवर विनाकारण गोळीबार व उखळी तोफांचे गोळे डागले, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानी रेंजर्सनी रामगड, सांबा, कथुआ आणि हीरानगर सेक्टरमधील वस्त्या आणि ३० सीमा चौक्यांना लक्ष्य बनवून ८२ एमएमचे उखळी तोफगोळे डागले आणि हेवी मशीन गन्सने गोळीबार केला, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
पाकच्या या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडून हा गोळीबार सुरू होता.
यात रामगडचा एक नागरिक जखमी झाला तर अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. पाकिस्तानने रविवारी केलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)