पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, लष्कराचे चोख प्रत्युत्तर
By Admin | Published: June 1, 2017 09:15 AM2017-06-01T09:15:41+5:302017-06-01T11:08:14+5:30
सीमेपलिकडील देशातून होणा-या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - सीमेपलिकडील देशातून होणा-या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. सकाळी जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास केजी आणि नौशेरा सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. आताही पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्ताननं नौशेरमधील भारतीय लष्कराच्या 8 पोस्टना टार्गेट करत गोळीबार सुरू केला. पाकिस्ताननं कुरापती सुरू केल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांच्या भ्याड हल्ल्याला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. यामुळे सीमेलगत असलेल्या गावांमधील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत. सतत होणा-या हल्ल्यांमुळे येथील स्थानिकांना जीव वाचवण्यासाठी आपले राहतं घर सोडावे लागत आहे.
J&K: Pak Army initiated indiscriminate firing of small arms, automatics & mortars along LoC in Naushera & KG sectors, since early morning. pic.twitter.com/spK2uimJp4
— ANI (@ANI_news) June 1, 2017
यापूर्वी 28 मे रोजी देखील पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या हल्ल्यात केरन सेक्टरमध्ये लष्करातील एका हमालाचा मृत्यू झाला होता व एक नागरिक जखमी झाला होता.
तर दुसरीकडे, गुरुवारी (1 जून) पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सोपोर येथील नाथी पोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
चकमकीनंतर परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.
दरम्यान, बुधवारी (31 मे) सोपोरमध्ये पोलीस दलावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. या भ्याड हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले होते. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. बुधवारी दुपारी 4.10 वाजण्याच्या सुमारास सोपोर येथे एका बँकेजवळ तैनात पोलिसांच्या गटावर ग्रेनेड फेकण्यात आल्याने चार पोलीस जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर जखमी पोलिसांना तातडीनं उपचारांसाठी जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तत्पूर्वी काश्मीर खोऱ्यात 27 मे रोजी तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 10 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला होता. बुरहाननंतर सबजार भट्ट दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता. त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत सबजार आणि त्याचा साथीदार मारला गेला.
सबजार भट्ट मारला गेल्याचे वृत्त पसरताच, काश्मीरच्या अनेक भागांत तणाव निर्माण झाला होता. किमान ५0 ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती.