पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:05 AM2024-05-05T06:05:36+5:302024-05-05T09:58:32+5:30
झारखंड येथील पलामू आणि गुमला येथे शनिवारी प्रचारसभांमध्ये मोदी म्हणाले की, पाकिस्तानला भलेही काँग्रेसचा शहजादा पंतप्रधान बनावा असे वाटत असेल; मात्र भारताच्या जनतेला समर्थ देशासाठी कणखर पंतप्रधान हवा आहे.
एस. पी. सिन्हा / विभाष झा
लोकमत न्यूज नेटवर्क
पलामू : आमच्या सरकारने केलेले सर्जिकल स्ट्राइक व हवाई हल्ल्यांनी पाकिस्तान हादरला आहे. त्यामुळे काँग्रेसचा शहजादा भारताचा पंतप्रधान बनायला हवा अशी प्रार्थना पाकिस्तानमधील नेते करीत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर ही टीका केली.
झारखंड येथील पलामू आणि गुमला येथे शनिवारी प्रचारसभांमध्ये मोदी म्हणाले की, पाकिस्तानला भलेही काँग्रेसचा शहजादा पंतप्रधान बनावा असे वाटत असेल; मात्र भारताच्या जनतेला समर्थ देशासाठी कणखर पंतप्रधान हवा आहे. भारतावर केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तान पाठिंबा देत होता. भारतात काँग्रेसचे राज्य असताना पाकिस्तान अशा पद्धतीने वागत असे. मात्र नवभारताने पाकिस्तानला दयामाया दाखविली नाही. आम्ही त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक तसेच हवाई हल्ले केले.
मोदी म्हणाले की, देशात दहशतवादी हल्ला झाला की याआधी काँग्रेसची केंद्र सरकारे असहायपणे त्या स्थितीकडे पाहत असत. पण आता परिस्थिती
बदलली आहे. आता पाकिस्तान स्वत:च्या रक्षणासाठी जगातील अनेक देशांकडे मदत मागत आहे.
‘कोरोना काळात बिहारींना ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी पळवून लावले’
दरभंगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील दरभंगा येथील प्रचारसभेत शुक्रवारी म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात दिल्ली व महाराष्ट्रातून बिहारी लोकांना पळवून लावण्याचे काम इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी केले. त्याचे उत्तर आता या पक्षांनी दिले पाहिजे.
मागील लोकसभा निवडणुकांत मतदारांनी आम्हाला दिलेल्या कौलामुळेच ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेता आला. तसेच अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर उभारण्यात आले. मुस्लिमांना राखीव जागा देण्यासाठी राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा
काँग्रेसचा डाव आम्ही उधळून लावू, असे नरेंद्र माेदी म्हणाले.