पाकिस्तानची भारताला धमकी, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केला तर याद राखा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 03:39 PM2018-02-12T15:39:07+5:302018-02-12T16:18:54+5:30
जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आतापासूनच धमक्यांची भाषा सुरु केली आहे.
श्रीनगर - जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई करेल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आतापासूनच धमक्यांची भाषा सुरु केली आहे. सुंजवां लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप भारतीय तपास यंत्रणांनी केला आहे. पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावताना भारताने तपासाशिवाय निष्कर्ष काढल्याचे म्हटले आहे.
शनिवारी पहाटे जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये पाच जवान शहीद झाले. एका सैनिकाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दहा जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भारताने या हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे कि, हल्ल्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्याची आता पद्धतच रुढ झाली आहे. भारतीय अधिकारी बेजबाबदार आणि तथ्यहीन आरोप करत आहेत.
काश्मीरमधील सशस्त्र बंड मोडून काढण्यासाठी भारत काश्मीरमध्ये क्रूरता दाखवत आहे. त्यावरुन लक्ष वळवण्यासाठी भारत असे आरोप करत आहे. भारताने नियंत्रण रेषा पार करुन काही आगळीक केली, तर खपवून घेणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सुमदाय भारताला काश्मीरमध्ये मानवधिकाराचे उल्लंघन करण्यापासून रोखेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे.
इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीद
जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यानंतर, तिथून पळ काढणारे दहशतवादी कॅम्पजवळच्याच इमारतीत लपले असून त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्कराने इमारतीला वेढा घातला असून ते दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण, श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जवानांचं काम आणखी कठीण झालंय.