‘पाकमध्ये आम्हाला गुप्तहेर म्हटले गेले’
By admin | Published: March 21, 2017 12:28 AM2017-03-21T00:28:36+5:302017-03-21T00:28:36+5:30
आम्ही भारताच्या ‘रीसर्च अँड अॅनालिसिस विंग’चे (रॉ) गुप्तहेर असल्याची खोटी बातमी पाकिस्तानातील वृत्तपत्राने प्रसिद्ध केली,
नवी दिल्ली : आम्ही भारताच्या ‘रीसर्च अँड अॅनालिसिस विंग’चे (रॉ) गुप्तहेर असल्याची खोटी बातमी पाकिस्तानातील वृत्तपत्राने प्रसिद्ध केली, असे पाकिस्तानातून सुखरूप परत आलेल्या येथील हजरत निजामुद्दीन दर्ग्याच्या दोनपैकी एका धर्मगुरूने सांगितले.
सय्यद आसिफ अली निजामी आणि त्यांचे पुतणे नजिम निजामी पाकिस्तानात गेले असता, अचानक ‘गायब’ झाल्याने चिंता व्यक्त केली गेली होती. दिल्लीत परत आल्यावर नजिम निजामी यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानमधील ‘उम्मत’ नावाच्या वृत्तपत्राने आम्ही ‘रॉ’चे गुप्तहेर असल्याची खोटीनाटी बातमी फोटोसह छापली. यामुळे तेथील सुरक्षा यंत्रणेने आमचे जाबजबाब घेतले, पण कोणताही त्रास दिला नाही, असे ते म्हणाले.
पाकिस्तानातून परत येण्यासाठी केलेल्या मदतीसाठी या दोघांनी भारत सरकार, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानले, नंतर त्यांनी सुषमा स्वराज यांची भेट घेतली.
नातेवाईकांना भेटण्यासाठी हे दोघे आधी कराचीला व नंतर धार्मिक यात्रेसाठी लाहोराल गेले होते. हजरत निजामुद्दीन यांच्या काही भक्तांना भेटण्यासाठी सिंध प्रांताच्या अंतर्गत भागात गेलो. तेथे मोबाइल संपर्क नव्हता, म्हणून आम्ही गायब झाल्याची आवई उठली, असे या दोघांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)