...तर पाकिस्तान एका दिवसात वठणीवर येईल
By admin | Published: September 22, 2016 07:37 PM2016-09-22T19:37:31+5:302016-09-22T19:42:34+5:30
जर भारताने ठरवलं तर तो पाकिस्तानला एका मिनिटात वठणीवर आणू शकतो. 1960 मध्ये दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला होता. जर हा करार भारताने तोडला
Next
>सुरेश डुग्गर/ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.22- नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जर भारताने ठरवलं तर तो पाकिस्तानला एका मिनिटात वठणीवर आणू शकतो. 1960 मध्ये दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला होता. जर हा करार भारताने तोडला तर पाकिस्तानात पाण्यासाठी हाहाकार माजेल. जर हे पाऊल भारताने उचललं तर ते पाकिस्तानवर अणू बॉम्ब टाकल्यासारखं असेल.
या करारानुसार जम्मू-काश्मीरमधून वाहणा-या सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचं पाणी पाकिस्तानला जातं. मात्र, हे पाणी जम्मू-काश्मीरच्या लोकांना वापरता येत नाही. सिंधु नदीवर बांध बांधायचा असेल तरी पाकिस्तानची परवानगी घ्यावी लागते. आता जम्मू-काश्मीरच्या नागरिकांसोबतच अनेक नेतेही हे मानतात की, हा करार भारताने तोडावा. यामध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला हे आघाडीवर आहेत. डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी माजी पंतप्रधान वाजपेयींच्या काश्मीर दौ-यात तर ही मागणी लावून धरली होती. भारताने हा करार स्थगित केल्यास पाकिस्तानला गुडघे टेकण्याची वेळ आल्याशिवाय राहाणार नाही.
पाकिस्तान पूर्णपणे भारताच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात भारताने पाणी पुरवठा रोखल्यास आधीच आर्थिकदृष्ट्या खिळखिल्या झालेल्या पाकिस्तानाला भिक मागण्याची वेळ येऊ शकते. कारण पाण्यावाचून पाकमध्ये शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारत असं करेल की नाही यामध्ये शंका आहे.
भारत-पाकमध्ये झाला होता हा करार…
– भारत- पाकमध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनुसार 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये इंडस वॉटर ट्रीटी अर्थात सिंधू पाणी वाटप करार झाला होता.
– या करारावर भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल अयूब खान यांच्या स्वाक्षरी आहेत.
– करारानुसार, भारत पाकिस्तानला सिंधु, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी नदीचे पाणी देतो.
– या नद्यांचे 80 टक्क्यांहून जास्त पाणी हे पाकिस्तानला मिळते.
पाकिस्तानवर होईल परिणाम…
– भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्यास पाण्यावाचून शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्यावर पाकिस्तान ताळ्यावर येईल.
– कारण, शेती ही पावसाच्या पाण्यावर नव्हे, तर नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.
– यामुळेच तर पाकिस्तानचा भारताच्या बगलियार आणि किशनगंगा पॉवर प्रोजेक्ट्सला विरोध करत आहे. यासाठी भारतावर आंतराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
– भारताचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स तयार झाल्यास पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळेल.