पाकिस्तानला PoK मधील अत्याचाराचे परिणाम भोगावे लागतील, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 03:48 PM2022-10-27T15:48:20+5:302022-10-27T15:50:07+5:30
"जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल."
पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरातील जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत आहे. याचे परिणाम त्याला भोगावे लागतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा मिळविण्यासंदर्भात संकेत देत, जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल, असेही राजनाथ यांनी म्हटले आहे.
‘शौर्य दिवस’ कार्यक्रमाला गुरुवारी संबोधित करताना राजनाथ म्हणाले, ‘आपण जम्मू काश्मीर आणि लद्दाखमध्ये विकासाच्या यात्रेला नुकतीच सुरुवात केली आहे. आपण जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू तेव्हाच आपले लक्ष्य पूर्ण होईल.’ भारतीय हवाई दलाचे जवान 1947 मध्ये आजच्याच दिवशी श्रीनगरमध्ये पोहोचले होते. या घटनेच्या आठवणीनिमित्त ‘शौर्य दिवसा’चे आयोजन केले जाते.
‘दहशतवादाचा धर्म नाही’ -
पाकिस्तानकडून पीओकेमधील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करत राजनाथ म्हणाले, शेजारील देशाला ‘‘याचे परिणाम भोगावे लागतील’’. तसेच, ‘दहशतवाद्याला कुठलाही धर्म नसतो. केवळ भारताला निशाणा बनवणे, हाच दहशतवाद्यांचा एकमेव हेतू आहे, असेही राजनाथ यांनी म्हटले आहे.