पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार, गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 07:17 AM2019-02-15T07:17:56+5:302019-02-15T07:18:21+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावार पाकिस्तान पुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावार पाकिस्तान पुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल. संपूर्ण भारताला हादरवून टाकणाऱ्या या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जे काही करावे लागेल ते निश्चितच केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समस्त भारतीयांना दिली.
हा पाकिस्तान आश्रित आणि पुरस्कृत हल्ला आहे. अशा दहशतवादी हल्ल्याने शांततेला सुरुंग लावू पाहणाºयांचा डाव कणखरपणे उधळून लावण्यात सरकार कटीबद्ध आहे, अशी हमी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीयांना दिली.
राजनाथ सिंह हे शुक्रवारी श्रीनगरला भेट देऊन स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच वरिष्ठ सुरक्षा आणि पोलिस अधिकाºयांची बैठक घेऊन पुढील कृतीबाबत आढावा घेतील. सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यामुळे राजनाथ सिंह यांनी बिहारमधील शुक्रवारचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.
राजनाथ सिंह यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी फोनवर चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेतली. राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा, गुप्तचर विभागाचे संचालक राजीव जैन आणि सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांच्याशी चर्चा केली. तसेच, त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आजचा हल्ला अतिशय वेदनादायी होता. जखमी जवान लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. काश्मिरातील परिस्थितीवर गृह मंत्रालय लक्ष ठेऊन आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी शुक्रवारी काश्मिरातील परिस्थितीवर बैठक होण्याची शक्यता आहे.
सुरक्षाविषयक समितीची
आज होणार बैठक
काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची शुक्रवारी सकाळी बैठक होणार आहे. त्यात काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली जाईल.