पाकिस्तानी वधूला मिळाला व्हिसा, मानले सुषमा स्वराज यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 12:13 PM2017-08-01T12:13:46+5:302017-08-01T12:19:06+5:30
पाकिस्तानमधील कराचीत राहणा-या 25 वर्षीय सादिया आणि लखनऊमधील सय्यद यांच्या प्रेमाआड येणारी सीमारेषा ओलांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
नवी दिल्ली, दि. 1 - पाकिस्तानमधील कराचीत राहणा-या 25 वर्षीय सादिया आणि लखनऊमधील सय्यद यांच्या प्रेमाआड येणारी सीमारेषा ओलांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हिसा मिळत नसल्याने सादियाला इच्छा असूनही भारतात येता येत नव्हते. मात्र आता ही समस्या सुटली असून तिला व्हिसा मिळाला आहे. इतके दिवस व्हिसामुळे थांबलेली लग्नाची तयारी पुन्हा एकदा सुरु झाली असून सादियाच्या कुटुंबियांनी सामान भरण्यास सुरुवात केली आहे. सादिया आणि सय्यद याच महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत.
सादिया आणि सय्यद यांचं एकमेकांशी सूत जुळलं होतं, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सीमा ओलांडणारं त्याचं प्रेम व्हिसामुळे अडकलं होतं. 1 ऑगस्टला दोघं विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्यांचं राष्ट्रीयत्व प्रेमाच्या आड आलं होतं. सादियाला व्हिसा मिळत नसल्याने अखेर तिने केंद्रीय परराष्ट मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे धाव घेत मदत मागितली होती.
सादियाला व्हिसा मिळण्याचा मार्ग काही सोपा नव्हता. आपला भाऊ, आई आणि स्वत: साठी व्हिसा मिळवण्यासाठी तिची धडपड चालू होती. दोनवेळा अपयश हाती आल्यानंतर अखेर तिस-या प्रयत्नात तिला व्हिसा मिळाला. काही दिवसांपुर्वी सादियाला व्हिसा मिळत नसल्याचं वृत्त समोर आल्यानंतर होतं. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी तात्काळ व्हिसा देण्याचा आदेश दिला होता.
सादियाने सांगितलं होतं की, 'मला अटारी बॉर्डरवरुन ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी व्हिसा मिळाला आहे. यासाठी मानावे तितके आभार कमी आहेत. गतवर्षी जेव्हापासून मी व्हिसासाठी अर्ज केला, तेव्हापासून मला फक्त समस्यांनाच सामोरं जावं लागलं आहे. माझा अर्ज वारंवार फेटाळण्यात आला'. सादिया यांच्यासोबत अन्य दोघेजण असणार आहेत. समझौता एक्स्प्रेसने सर्वजण दिल्लीला येतील त्यानंतर लखनऊला जाणार आहेत.
गृहमंत्रालय कार्यालयाने 13 जुलै रोजी या प्रकरणाची दखल घेतली आणि अर्जांची छाननी केली. यानंतर हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर व्हिसा प्रक्रिया पुर्ण करण्यात आली अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे.
व्हिसाची बातमी मिळताच सादिया आणि सय्यद यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सादियाने सांगितलं की, 'व्हिसा मिळाल्यानंतर सर्वात आधी मी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात फोन केला. मात्र त्यांनी यासंबंधी काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. यानंतर मला एक फोन आला आणि पासपोर्ट पाठवण्यास सांगण्यात आलं. दोन दिवसानंतर व्हिसासोबत आमचे पासपोर्ट परत करण्यात आले'.
सादिया आणि सय्यद यांचा विवाह 1 ऑगस्ट रोजी होणार होता. मात्र आता त्यांना तारीख बदलावी लागणार आहे. आता ज्या तारखेचे तिकीट मिळतील त्यानुसार लग्नाची तारीख ठरवली जाईल.