पाकिस्तानी अभिव्यक्तीचीही जागतिक भरारी
By admin | Published: April 4, 2015 11:27 PM2015-04-04T23:27:20+5:302015-04-04T23:27:20+5:30
पाकिस्तानात हल्ले, दंगली होतात. सततचे टेन्शन, मानसिक दडपण असते. पण अशा परिस्थितीमध्येही येथील तरुणांमध्ये ललित कला मूळ धरत आहेत.
संमेलनात कवयित्री सलिमा हश्मी यांचा विशेष सत्कार
नम्रता फडणीस - घुमान
पाकिस्तानात हल्ले, दंगली होतात. सततचे टेन्शन, मानसिक दडपण असते. पण अशा परिस्थितीमध्येही येथील तरुणांमध्ये ललित कला मूळ धरत आहेत. एका साचेबद्ध प्रवाहात न अडकता स्वतंत्र विचारातून वेगवेगळ्या माध्यमांतून ते स्वत:ला व्यक्त करत आहेत. जागतिक स्तरावर त्यांच्या आविष्कारांना दाद मिळत आहे. हे चित्र आशादायी आहे. ‘पाकिस्तानमे टॅलेंट उभर रहा है’, असे मत लाहोरच्या ज्येष्ठ कवयित्री सलिमा हश्मी यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध उर्दू शायर दिवंगत फैझ अहमद फैज यांच्या लाहोर येथील कन्या सलिमा हश्मी याही संमेलनात आवर्जून सहभागी झाल्या आहेत. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. दहशतवादामुळे पाकिस्तानचे चित्र आज वेगळ्या पद्धतीने रंगविले जात आहे. मात्र, केवळ याच एका गोष्टीपुरती पाकिस्तानची ओळख सीमित व्हायला नको. वाळवंटात कमळ उमलावे त्याप्रमाणे तिथेही कला, साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात नवीन प्रयोग होत आहेत.
अभिव्यक्त कशा पद्धतीने व्हायचे हा खरेतर ज्याचा त्याचा मुद्दा आहे. संकुचित विचारसरणीमुळे अभिव्यक्तीवर घाला घालण्याची कामे होतात. जेव्हा एखाद्या लेखकावर वाईट वेळ येते, तो काळ खूप कठीण असतो. परंतु त्यातून जावे लागते. काही चांगले करायचे असल्यास त्याची किंमत मोजावी लागते. क्वचितप्रसंगी
अशा घटनांमध्ये प्राणासही मुकावे लागते. राजकीय, धार्मिक हे मुद्दे खरेतर कलात्मक दृष्टिकोनातून खूपच गौण असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत- पाकिस्तान
टेबल चर्चा घडावी
भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर एक टेबल टाकावे आणि दोन्हीकडून संवादात्मक चर्चा व्हावी. कितीही लढाया झाल्या तरी संवाद सुरू राहायला हवा. कारण कोणतीही लढाई ही संवादातूनच जिंकली जाऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हम लोगोंके दिल मे
राज करते है
पाकिस्तानी कलाकारांवर भारतात येण्यास बंदी घातली जाते. त्यांचे कार्यक्रम बंद पाडले जातात, याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, हम तो लोगोंके दिलोंपे राज करते हैं...काही लोकांच्या विरोधामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही.
‘मलाला डे’ केला साजरा
शिक्षणासाठी दिलेल्या लढ्यामुळे ‘पाकिस्तान की बेटी’ म्हणून गौरविलेल्या मलाला हिला नोबेल पुरस्कार मिळाला. याप्रसंगी लाहोर विद्यापीठातील प्रत्येक मुलीने तसेच काही पुरुषांनीही ‘मलाला डे’ साजरा केला. कुटुंबाची जबाबदारी मुलगीच घेऊ शकते, अशी जाणीव झाल्यामुळे मुलींनाही शिकवायची मानसिकता पाकिस्तानी कुटुंबांमध्ये निर्माण होत असल्याचे हश्मी यांनी सांगितले. महिला अत्याचारांचे प्रमाण पाकिस्तानातही इतर देशांप्रमाणेच आहे. मात्र ही एकट्या महिलेची लढाई नसून पुरुषी मानसिकता बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.