पाकिस्तानी अतिरेक्याचा काश्मिरात खात्मा; श्रीनगरमधील हारवान परिसरात चकमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:26 AM2021-12-20T05:26:45+5:302021-12-20T05:27:24+5:30
सुरक्षा दलाने पाकिस्तानमधील कराचीत राहणारा लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा खात्मा करून मोठे यश मिळविले.
सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू: रविवारी सकाळी उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने पाकिस्तानमधील कराचीत राहणारा लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा खात्मा करून मोठे यश मिळविले. दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबाराने श्रीनगर शहर हादरले. श्रीनगरमधील हारवान परिसरात उडालेल्या चकमकीतून दिसते की, दहशतवाद्यांच्या निशाण्यावर श्रीनगर असल्याने कळते.
हारवान परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने नाकेबंदी करून शोध मोहीम राबविली. एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरुवातीला सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले; परंतु, दहशतवाद्यांनी ते न ऐकता सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यामुळे सुरक्षा दलानेही पलटवार करीत गोळीबार केल्याने दोन्ही बाजूने चकमक उडाली. यात लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफऊल्लाह ऊर्फ अबू खालिद ऊर्फ खालीद भाई (कराची, पाकिस्तान) ठार झाला. २०१६ पासून तो हारवान परिसरात सक्रिय होता. अन्य एका घटनेत अनंतनाग पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक केली. फिरोज अहमद (कुलगाम) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून शस्त्रे जप्ते करण्यात आली आहेत.