'पाकिस्तानी फूड फेस्टीव्हल'चं आयोजन, बजरंग दलाने केला हॉटेलमध्ये राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:56 PM2021-12-14T14:56:33+5:302021-12-14T15:07:06+5:30
गुजरातच्या सूरत येथील रिंगरोड परिसरात असलेल्या हॉटेलबाबतीत हा प्रकार घडला आहे. संबंधित रेस्टॉरंटमध्ये 12 डिसेंबर ते 22 डिसेंबर कालावधीत 'टेस्ट ऑफ इंडिया' नावाचा एक महोत्सव होत आहे
सुरत - आपल्या देशात पाकिस्तानी फूड फेस्टीव्हलचं आयोजन केल्याचा संताप व्यक्त करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका हॉटेलवर हल्ला (Bajrang Dal attacks on restaurant) केल्याची घडली. हॉटलेच्या बाहेरील बाजूस एक बॅनर लावण्यात आला होता. त्यावर, पाकिस्तानी फूड फेस्टीव्हल असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित हॉटेलवर मोर्चा वळवत तोडफोड केली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या.
गुजरातच्या सूरत येथील रिंगरोड परिसरात असलेल्या हॉटेलबाबतीत हा प्रकार घडला आहे. संबंधित रेस्टॉरंटमध्ये 12 डिसेंबर ते 22 डिसेंबर कालावधीत 'टेस्ट ऑफ इंडिया' नावाचा एक महोत्सव होत आहे. त्यामध्ये 'पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल'चंदेखील आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठीची जनजागृती म्हणून एक मोठं बॅनरही रेस्टॉरंटच्या बाहेर लावलं होतं. त्यामुळे, येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन हा बॅनर जाळून टाकला. त्यावेळी, जय श्रीरामचा जयघोषही केला. संबंधित रेस्टॉरंटने आपली चूक मान्य केल्याचा दावाही बजरंग दलाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं केला आहे.
दरम्यान, काही लोकांच्या भावना दुखावल्यामुळे संबंधित कार्यक्रमातून "पाकिस्तानी" हा शब्द काढून टाकण्यात येईल. मात्र, रेस्टॉरंटमध्ये मुघलाई खाद्यपदार्थ बनवणं सुरूच राहणार असल्याचं हॉटेलचे संचालक संदीप डावर यांनी सांगितले.