याचसाठी केला होता अट्टाहास, पाकिस्तानी नवरदेवाची भारतात वरात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 01:40 PM2019-08-19T13:40:38+5:302019-08-19T13:42:06+5:30
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या या निर्णयाला समर्थन मिळत आहे. कलम 370 आणि 35 ए हे कलम हटविल्यामुळे भारतीय नागरिक आता काश्मीरमध्ये जागा खरेदी करू शकणार आहेत. तसेच, काश्मीरी मुली भारतातील कुठल्याही नागरिकाशी लग्न करु शकणार आहेत. या लग्नपर्वाला सुरूवात झाली, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, काश्मीर सीमारेषेवरही तणाव दिसून येत आहे. माहेश्वरी समाजाचे दोन तरुण कराचीवरुन गुजरातला आले असून त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. येत्या शनिवारी त्यांचे लग्न होत आहे. राजकोट माहेश्वरी समाजाने राजकोट येथे या लग्नाचे आयोजन केले आहे.
राजकोट माहेश्वरी समजाचे युवा अध्यक्ष भवेश माहेश्वरी यांनी याबाबत माहिती दिली. या सामाजिक संघटनेनं पाकिस्तानमधील 90 पेक्षा अधिक जोडप्यांचे लग्न लावून देण्यास आणि भारतात स्थीरावण्यास मदत केली आहे. पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेले माहेश्वरी समुदायाचे बहुतांश लोकं भारतात राहू इच्छित असल्याचं भवेश यांनी म्हटलं. फाळणीपासून या समाजातील अनेक लोकं आजतायायत पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत आहेत, असे नवरदेव अनिल माहेश्वरी यांनी म्हटले.