Citizenship Amendment Bill: नव्या विधेयकाचं असंही स्वागत; अनोख्या नावानं मुलीचं बारसं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 08:10 PM2019-12-12T20:10:36+5:302019-12-12T20:12:16+5:30
नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर बाळाचं नामकरण
नवी दिल्ली: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झालं. हे विधेयक राज्यसभेत मंजूर करुन घेताना मोदी सरकारची कसोटी लागेल, असा कयास होता. मात्र गृहमंत्री अमित शहांनी मोठ्या खुबीनं परिस्थिती हाताळत विधेयक मंजूर करुन घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर ईशान्य भारतामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अनेकांनी या विधेयकाचं स्वागतही केलं आहे. भारतात आलेल्या निवार्सितांनी विधेयक मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.
पाकिस्तानातून भारतात आलेल्या एका हिंदू कुटुंबानं नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. २०११ मध्ये पाकिस्तानातून एक कुटुंब भारतात दाखल झालं. मात्र अद्याप या कुटुंबाला भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही. पाकिस्तानातून भारतात आलेल्या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. त्यातला मोठा मुलगा दोन वर्षांचा आहे. तर लहान मुलगी अवघी दोन दिवसांची आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच दाम्पत्यानं या मुलीचं नामकरण केलं. 'नागरिकता' असं अनोखं नाव या मुलीला देण्यात आलं.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावर पाकिस्तानातून भारतात आलेल्या या कुटुंबाचं भवितव्य अवलंबून आहे. विधेयकाचं लवकरात लवकर कायद्यात रुपांतर होईल आणि आम्हाला भारताचं नागरिकत्व मिळेल, अशी आशा या कुटुंबाला आहे. बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच देशात विधेयकाची चर्चा होती. त्यामुळेच मुलीला हे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचं दाम्पत्यानं सांगितलं.
मोदी सरकारचं अतिशय महत्त्वाकांक्षी असलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक काल राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकाच्या बाजूनं १२५ सदस्यांनी तर विरोधात १०५ खासदारांनी मतदान केलं. तत्पूर्वी हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याबद्दलही राज्यसभेत मतदान झालं. मात्र या सूचनेच्या बाजूनं केवळ ९९ मतं पडली. तर १२४ मतं या सूचनेविरोधात गेली.
विधेयक मंजूर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला. 'आपल्या देशाच्या बंधुभावाच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याचा आनंद आहे. या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या सर्व खासदारांचे मी आभार मानतो. यामुळे कित्येक वर्षांपासून अत्याचार सहन करणाऱ्या अनेकांना दिलासा मिळेल,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं.