पाकिस्तानी नव-याची भारतीय पत्नीला धमकी, सुषमा स्वराजांची मध्यस्थी
By admin | Published: March 21, 2017 12:35 PM2017-03-21T12:35:52+5:302017-03-21T12:35:52+5:30
पाकिस्तानमधील आपल्या मुलीला सासू - सासरे त्रास देत असल्याची तक्रार करणा-या पित्याच्या मदतीला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज धावल्या आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - पाकिस्तानमधील आपल्या मुलीला सासू - सासरे त्रास देत असल्याची तक्रार करणा-या पित्याच्या मदतीला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज धावल्या आहेत. पित्याने युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून तक्रार केली होती. सुषमा स्वराज यांनी तक्रारीची दखल घेतली असून भारतीय उच्चायुक्ताने पीडित तरुणीची भेट घेतली असून सुरक्षित भारतात परतण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती दिली आहे.
सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार 'मला मोहम्मद अकबर यांच्याकडून युट्यूब मेसेज आला होता. त्यानुसार भारतीय नागरिक असलेली त्यांची मुलगी मोहम्मदिया बेगम हिचा पाकिस्तानात विवाह झालेला आहे. आणि तिचे सासू - सासरे तिचा छळ करत आहेत. आमच्या उच्चायुक्तांनी तिची भेट घेतली असता तिने पुन्हा भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या पासपोर्टचं नुतनीकरण करुन तिला पुन्हा परत आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे'.
हैदराबादची रहिवासी असलेल्या या तरुणीचा पासपोर्ट एक्स्पायर्ड झाला असल्याने सुषमा स्वराज यांनी त्याचे नुतनीकरण करण्याचा आदेश दिला आङे. दरम्यान मोहम्मदिया बेगम हिने आपली आई हजारा बेगम यांच्याशी बातचीत केली असून भारतीय उच्चायुक्तांनी भेट घेतल्यानंतर आपल्या पती मोहम्मद युनिसने एका खोलीत डांबून ठेवून आपल्याला मारहाण केली असल्याचं सांगितलं आहे.
आपल्यावर होणारा अत्याचार सहन होत नसल्याने मोहम्मदिया बेगमला अनावर होत असताना तिच्या आईने तिला संयम बाळगत भारतीय उच्चायुक्ताकडून मिळणा-या मदतीची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. 'तुमची आई हिंदुस्तानी असून सर्व हिंदुस्तानी हिंदू असतात असं सांगत युनिसने मुलांनाही आईपासून दूर राहण्यास सांगितलं आहे', अशी माहिती हजारा बेगम यांनी दिली आहे.
युनिसने मोहम्मदिया बेगमला जिवंत भारतात परतू देणार नसल्याची धमकीच दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने दुसरं लग्नही केलं आहे. 'सतत होणा-या अत्याचारामुळे आपल्या मुलीची तब्येत खराब झाली असून तिला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं', हजारा बेगम यांनी सांगितलं आहे.
मोहम्मदिया बेगम आणि युनिस यांनी एकूण पाच मुलं आहे. यामध्ये तीन मुलं आणि दोन मुली आहेत. सर्वात मोठा मुलगा नऊ वर्षाचा आहे. त्याचा जन्म पाकिस्तानात झाला असून इतरांचा मस्कतमध्ये झाला आहे. विशेष म्हणजे लग्नाआधी आपण मस्कतचे रहिवासी आहोत असं युनिसने सांगितलं होतं. फोनवरुन त्यांचा निकाह झाला होता. लग्नाच्या 12 वर्षानंतर जेव्हा युनिसने नोकरी गमावली तेव्हा तो पाकिस्तानचा असल्याची माहिती समोर आली. मोहम्मदिया बेगम 2012 रोजी भारतात आली होती. 21 वर्षातील तिचा हा एकमेव भारत दौरा होता.