पाकिस्तानी वृत्तपत्रातील 'सर्जिकल स्ट्राईक'ची बातमी निराधार
By Admin | Published: October 14, 2016 12:50 PM2016-10-14T12:50:39+5:302016-10-14T12:58:28+5:30
पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी जर्मनीचे राजदूत यांनी सांगितले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.14 - उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानने धसका घेतल्याचे दिसत आहे. तसेच भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झाल्याचेही पाकिस्तान वारंवार नाकारत आहे. आता पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीमध्ये जर्मनीचे राजदूत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितले', अशी बातमी छापून पाकिस्तानने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक न झाल्याचा कागांवा केला आहे.
दरम्यान, ही बातमी कथित आणि निराधार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्पष्ट केले आहे. '29 सप्टेंबर रोजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी अन्य देशांच्या राजदूतांना भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत माहिती दिली, त्यावेळी जर्मनीचे राजदूत देखील उपस्थित होते. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकविषयी कोणतीही चर्चा झाली नाही'. असेही स्पष्ट करण्यात आले असून भारताने पाकिस्तानी मीडियाने छापलेले कथित वृत्त फेटाळून लावले आहे.
आणखी बातमी
पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, 'भारताचे परराष्ट्र सचिव यांनी स्पष्ट शब्दांत भारतीय सैन्यांनी पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले नाही' अशी कथिक आणि खोटी बातमी सूत्रांची माहिती देत छापली होती.
दरम्यान, डॉन वृत्तपत्रात, पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने पाकिस्तानच्या सरकारने तेथील लष्कराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे, अशी बातमी पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. त्यानंतर 'द न्यूज इंटरनॅशनल'ने ही कथित आणि निराधार बातमी छापली आहे.
Our statement on a concocted and baseless News International Pakistan story pic.twitter.com/QcqQTJUM0C
— Vikas Swarup (@MEAIndia) October 14, 2016
उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, सीमारेषेजवळ भारताकडून केवळ गोळीबार करण्यात आल्याचे सांगत सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे पाकिस्तानने नाकारले आहे.