22 वर्षांपासून मोदींना राखी बांधते 'ही' पाकिस्तानी महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 10:45 AM2017-08-07T10:45:18+5:302017-08-07T10:50:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानातील एक मानलेली बहिण त्यांना रक्षा बंधनानिमित्त आज राखी बांधणार आहे.
नवी दिल्ली, दि. 7- भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असला तरी या दोन्ही देशातील नात्यांचा वेगळा पैलु दाखविणारी ही बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानातील एक मानलेली बहिण त्यांना रक्षा बंधनानिमित्त आज राखी बांधणार आहे. कमर मोहसिन शेख असं या महिलेचं नाव असून गेल्या 22-23 वर्षांपासून त्या मोदींना राखी बांधत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
मी गेल्या 22-23 वर्षापासून नरेंद्र मोदी यांना राखी बांधते आहे. यंदाही राखी बांधण्यासाठी उत्सुक असल्याचं कमर मोहसिन शेख यांनी सांगितलं आहे. लग्नानंतर कमर मोहसिन शेख या भारतात आल्या होत्या. तेव्हापासून त्या इथल्याच नागरीक आहेत. नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असताना कमर मोहसिन शेख यांनी मोदींना पहिल्यांदा राखी बांधली होती.
नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने ते कामात व्यस्त असतील त्यामुळे कमल शेख यंदा मोदींना राखी बांधणार नव्हत्या. पण काही दिवसापूर्वी मोदींनी त्यांना स्वत: फोन करून रक्षाबंधनाची आठवण करून दिली, असं त्यांनी सांगितलं. मोदींनी मला स्वतःहून फोन केल्याने मला अतिशय आनंद झाला आणि लगेचच रक्षा बंधनाच्या तयारीला लागल्याचं कमर मोहसिने शेख यांनी सांगितलं आहे.
कमर मोहसिन शेख यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे पण त्या लग्नानंतर भारतात स्थायिक झाल्या आहेत. नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यापासून कमर शेख मोदींना राखी बांधतात. मोदी कठोर मेहनती आणि दुरदर्शी असल्यानेच ते पंतप्रधानपदापर्यंत पोहचल्याचं कमर मोहसिन शेख म्हणाल्या आहेत.
वाराणसीच्या वृद्धाश्रमातील महिलांनी पंतप्रधान मोदींसाठी बनवल्या राख्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतील दुर्गाकुंड येथील वृद्धाश्रमातील विधवा महिलांनी स्वतः राख्या बनवून पंतप्रधान मोदींना पाठवल्या आहेत. या आश्रमात राहणा-या महिला पंतप्रधानांना आपल्या भावासमान मानतात. पंतप्रधान स्वतः रक्षाबंधनादिवशी आश्रमात येऊ शकत नाहीत. मात्र आपण आपल्या हाताने बनवलेल्या राख्या तरी पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकते,अशी भावना व्यक्त करत या महिलांनी पंतप्रधान मोदींना राख्या पाठवल्या आहेत.
राख्या बनवलेल्यांपैकी एक असलेल्या मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितलं की, रक्षाबंधन सणासाठी प्रत्येक बहिणीच्या मनात उत्साह-आनंद असतो. या आश्रमातील महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला भाऊ मानतात. यासाठी सर्व महिलांनी स्वतःच्या हाताने मोदींसाठी राखी बनवून पाठवल्या आहेत.
तर दुसरीकडे वाराणसीतील मुस्लिम महिलांनीदेखील स्वतः हाताने पंतप्रधान मोदींसाठी राख्या बनवल्या आहेत.