पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानना हैदराबाद विमानतऴावरुन माघारी पाठवले
By admin | Published: January 1, 2016 11:37 AM2016-01-01T11:37:55+5:302016-01-01T12:39:16+5:30
प्रसिध्द पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना गुरुवारी हैदराबाद विमानतळावर उतरल्यानंतर एक वाईट अनुभव आला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - प्रसिध्द पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना गुरुवारी हैदराबाद विमानतळावर उतरल्यानंतर एक वाईट अनुभव आला. राहत फतेह अली खान हैदराबादच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्यांना विमानतळावरील इमिग्रेशन अधिका-यांनी भारतात प्रवेश करण्यापासून रोखले आणि पुन्हा माघारी अबू धाबीला पाठवून दिले.
रहात फतेह अली खान हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये नववर्षाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तांत्रिक कारणामुळे विमानतळावरील इमिग्रेशन अधिका-यांनी त्यांना भारतात प्रवेश करु दिला नाही. पाकिस्तानी नागरीक भारतात हवाईमार्गे दिल्ली, मुंबई, कोलकता आणि चेन्नई या विमानतळांवरुनच प्रवेश करु शकतात. या चार शहरातील विमानतळाव्यतिरिक्त अन्य विमानतळावरुन पाकिस्तानी नागरीकांना भारतात प्रवेश दिला जात नाही.
पाकिस्तानी नागरीकांनी भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे. माघारी पाठवल्यानंतर राहत फतेह अली खान अबूधाबीला गेले. तिथून ते दिल्लीला जाणा-या विमानात बसले आणि दिल्लीवरुन विमानाने हैदराबादला पोहोचले. यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली. रात्री ८ ऐवजी ११ वाजता कार्यक्रम सुरु झाला.