पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पक्ष्याला स्थानिक पक्ष्यांनी मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:33 PM2019-05-03T13:33:34+5:302019-05-03T13:34:24+5:30
देशाच्या शत्रुची ओळख पक्ष्यांनाही पटविता येते का? बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एक खळबऴजनक घटना घडली आहे.
वैशाली : देशाच्या शत्रुची ओळख पक्ष्यांनाही पटविता येते का? बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एक खळबऴजनक घटना घडली आहे. एका पक्ष्याला काही पक्ष्यांनी चोचीने घायाळ केले आणि त्याचा जीव घेतला. यानंतर या पक्ष्याच्या खऱ्या रुपाचा उलगडा झाला. या पक्ष्याच्या पंखांखाली एक हेरगिरी करणारे य़ंत्र लावण्यात आले होते. यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. असे पक्षी राजस्थानमध्ये सापडतात आणि पाकिस्तान त्यांना पाठवत असते.
वैशालीच्या महनार ठाण्याच्या हसनपूर गावाच्या बाहेर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा नवखा पक्षी आकाशात उडताना पाहून तेथील स्थानिक पक्ष्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. यानंतर त्याला चोचीने बोचकारून घायाळ करण्यात आले. यामध्ये त्याचा जीव गेला. मात्र, य़ा पक्ष्यावर लावलेले यंत्र पाहून गावकऱ्यांना वेगळाच संशय आला. हेरगिरी करण्यासाठी हा पक्षी पाकिस्तानने सोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पक्षी पोलिसांना ताब्यात घेऊन वनविभागाला पोहोचविला आहे.
पक्ष्यांची लढाई पाहण्यासाठी गर्दी
आकाशात चाललेली पक्ष्यांची लढाई पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली. जवळपास अर्धा तास ही झुंज सुरु होती. शेवटी हा पक्षी एकटा पडल्याने त्याचा मृत्यू झाला. जेव्हा ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्या पक्ष्याच्या शरीरावर यंत्र लावलेले दिसले, तसेच पायामध्ये पितळेचा टॅगही होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे यंत्र लावलेले पक्षी पाकिस्तानातून हेरगिरीसाठी येतात. आंतरराष्ट्रीय सीमेवरील राजस्थानच्या जैसलमेरसारख्या जिल्ह्यांमध्ये ते दिसतात.
हा पक्षी बिहारमध्ये कसा?
पाकिस्तानी सीमेवर हेरगिरी करणे ठीक आहे. मात्र, हा पक्षी एवढ्या आतमध्ये बिहारमध्ये काय करत होता? आयएसआयच्या कोणत्या योजनेसाठी हा काम करत होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे.